मुंबई : सागरी किनारा मार्गाची एक बाजू वांद्रे – वरळी सागरी सेतूला जोडण्याचे काम पूर्ण झाले आहे. दक्षिण मुंबईच्या दिशेने जाणारी मार्गिका जोडण्यात आली असून ही मार्गिका महिन्याभरात वाहतुकीसाठी खुली होण्याची शक्यता आहे. मात्र या मार्गिकेवरून उत्तर मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरू करण्याचा पालिका प्रशासनाचा विचार आहे. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी वरळी परिसरात होणारी वाहतूक कोंडी दूर होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> महारेराचे ‘महाकृती’ संकेतस्थळ कार्यान्वित; संकेतस्थळाच्या वापराबाबत प्रशिक्षण सुरू

धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पाचे सुमारे ९२ टक्के काम पूर्ण झाले आहे. मरीन ड्राईव्ह ते वांद्रे वरळी सागरी सेतूपर्यंत हा मार्ग तयार केला जात आहे. या प्रकल्पांतर्गत आतापर्यंत टप्प्याटप्याने मार्गिकांचे लोकार्पण करण्यात आले आहे. बिंदू माधव ठाकरे चौक ते प्रिन्सेस स्ट्रीटपर्यंत दक्षिण वाहिनी मार्गिका १२ मार्च २०२४ पासून वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. मरीन ड्राइव्ह ते हाजीअली उत्तर वाहिनी मार्गिका १० जूनपासून अंशत: खुली करण्यात आली आहे. तसेच हाजी अली ते खान अब्दुल गफ्फार खानपर्यंत उत्तर दिशेने जाणाऱ्या साधारण ३.५ कि. मी. मार्गिकेचे काम पूर्ण झाले असल्याने ती नागरिकांच्या सोयीकरिता तात्पुरत्या स्वरुपात ११ जुलैपासून खुली करण्यात आली आहे. सागरी किनारा मार्ग पुढे वांद्रे – वरळी सागरी सेतूला जोडला जाणार आहे. हा प्रकल्प वांद्रे – वरळी सागरी सेतूला जोडण्यासाठी दोन तुळई (बो स्ट्रींग आर्च स्ट्रिंग गर्डर) यशस्वीपणे स्थापन केल्यानंतर दोन्ही मार्गिकांच्या कामांना वेग देण्यात आला आहे. त्यापैकी वांद्रे येथून मरीन ड्राईव्हकडे जाणाऱ्या मार्गिकेचे काम आता पूर्ण होत आले आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईकडे जाणारी वाहिनी या महिनाभरात सुरू होण्याची शक्यता आहे. १५ सप्टेंबर रोजी ही वाहिनी सुरू करण्यात येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> अपात्र ‘धारावी’करांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा; मिठागराची २५६ एकर जागा हस्तांतरित करण्यास केंद्राची परवानगी

दक्षिण वाहिनीवरून उत्तर दिशेची वाहतूक दक्षिण वाहिनी सुरू होणार असली तरी या वाहिनीवरून उत्तर मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरू केली जाण्याची शक्यता आहे. सागरी किनारा मार्गावर संध्याकाळच्या वेळी उत्तर मुंबईत जाणारी वाहने मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे वांद्रे – वरळी सागरी सेतूवर जाण्यासाठी प्रचंड संख्येने वाहने येत असल्यामुळे संध्याकाळी वरळी परिसरात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे नव्याने सुरू होणारी मार्गिका उत्तरेकडे जाणाऱ्या वाहनांसाठीच सुरू करावी अशी सूचना वाहतूक पोलिसांनी केली होती. त्यानुसार दक्षिण वाहिनीवरून उत्तर दिशेची वाहतूक सुरू करण्याचा पालिका प्रशासनाचा विचार आहे.