मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याला शिवसेनेचा तीव्र विरोध असल्याने सागरी किनारपट्टी रस्ता (कोस्टल रोड) हा मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्यासाठी चांगला पर्याय असून त्याला केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी तातडीने मान्यता द्यावी, अशी मागणी युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे. त्यामुळे आरे व गिरगावमधील मेट्रोला असलेला विरोध संपुष्टात येईल आणि  बसणाऱ्या रहिवाशांना दिलासा मिळेल, असे प्रतिपादन ठाकरे यांनी केले आहे.
किनारपट्टी रस्त्याचा प्रकल्प गेले तीन वर्षे केंद्रीय पर्यावरण विभागाच्या मंजुरीसाठी अडकला आहे. हा प्रकल्प महापालिका राबविणार आहे. आता भाजपच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार येऊनही अजून त्यास मान्यता मिळाली नसल्याने शिवसेनेत अस्वस्थता आहे.
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची परवानगी अंतिम टप्प्यात असून ती लवकरच मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकताच व्यक्त केला आहे. ती मिळाल्यानंतर भाजप-शिवसेनेत मेट्रो प्रकल्पावरुन असलेली लढाई अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.