मुंबई : सागरी किनारा मार्ग आणि वांद्रे वरळी सागरी सेतुला जोडणाऱ्या बहुप्रतिक्षित उत्तरवाहिनी पुलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी लोकार्पण करण्यात आले. सोमवारपासून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून, रोज सकाळी ७ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत वाहनांना प्रवेश दिला जाईल. या उत्तरवाहिनी पुलामुळे मुंबईकरांच्या वेळेसह इंधनाचीही बचत होणार आहे. धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प सुमारे ९४ टक्के काम पूर्ण झाले आहे. सागरी किनारा प्रकल्पाच्या उर्वरित कामांनाही महापालिकेने गती दिली आहे. या प्रकल्पातील उत्तरवाहिनी मार्गिकेचे नुकतेच प्रजासत्ताक दिनी फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
दरम्यान, वरळी, प्रभादेवी, लोअर परळ, लोटस जंक्शन आदी भागातील प्रवाशांना किनारी रस्ता प्रकल्पावर ये-जा करण्याची सुविधा देणाऱ्या तीन आंतरमार्गिकांचेही लोकार्पण करण्यात आले. या मार्गिकेमुळे मरीन ड्राईव्हकडून मुंबई किनारी रस्ता मार्गे सागरी सेतूकडे केवळ १० ते १२ मिनिटात पोहोचणे शक्य होणार आहे. यापूर्वी मरीन ड्राईव्हकडून सागरी सेतूकडे जाणारी वाहतूक ही दक्षिण वाहिनी पुलावरून सुरू ठेवण्यात आली होती. मात्र, आता उत्तर वाहिनी पूल उपलब्ध झाल्यामुळे दक्षिण वाहिनी पुलाचा वापर नियमित दिशेने केला जाणार आहे.
यावेळी माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्यमंत्री व पालकमंत्री अॅड. आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्याोजकता व नावीन्यता मंत्री व सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा, पालिकेचे आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी, प्रधान सचिव आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अमित सैनी, जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, उपायुक्त यतीन दळवी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
दिवसभरात सुमारे ३५ हजार वाहने
सागरी किनारा मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी सोमवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत दोन्ही दिशेची मिळून सुमारे ३५ हजार वाहने धावली. दक्षिण दिशेने सुमारे २१ हजाराहून अधिक वाहनानी प्रवास केला. तर उत्तर म्हणजेच वांर्द्याच्या दिशेने सुमारे १६ हजार वाहनांनी प्रवास केला.