मुंबई : धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील वाहतूक व्यवस्था आठवड्यातील सातही दिवस सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. प्रकल्पाची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी हा मार्ग शनिवारी व रविवारी बंद ठेवला जात होता. मात्र वाहतूक पोलिसांच्या विनंतीनुसार पालिकेने आता आठवड्याचे सातही दिवस सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला ठेवण्याचे ठरवले आहे.

धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट) उड्डाणपूल ते वांद्रे – वरळी सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंतच्या टप्प्याचे बांधकाम बृहन्मुंबई महानगरपालिका करीत आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचे ९२ टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाची दक्षिण मुंबईकडे जाणारी मार्गिका नुकतीच वांद्रे – वरळी सागरी सेतूला जोडण्याचे काम पूर्ण झाले. या मार्गिकेवरून उत्तर मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र प्रकल्पाची काही कामे शिल्लक असल्यामुळे सागरी किनारा मार्गाचा काही भाग शनिवारी व रविवारी बंद ठेवण्यात येतो. परंतु, त्यामुळे भुलाबाई देसाई मार्ग येथून सागरी किनारा मार्गाच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची गैरसोय होत होती. या परिसरात शनिवारी व रविवारी प्रचंड वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे हा संपूर्ण मार्ग शनिवारी व रविवारी सुरू ठेवावा अशा सूचना वाहतूक पोलीसांनी पालिकेच्या सागरी किनारा मार्ग विभागाला केल्या होत्या. त्यानुसार पालिका प्रशासनाने आता हा मार्ग आठवड्यातील सातही दिवस सुरू ठेवण्याचे ठरवले आहे.

हेही वाचा – मुंबई : हिरे व्यापाऱ्याच्या गाडीच्या धडकेत कामगाराचा मृत्यू, सागरी किनारा रस्त्यावरील घटना

हेही वाचा – मुंबई : पश्चिम रेल्वेवर १० तासांचा ब्लॉक, रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक

वाहतूक पोलिसांच्या सूचनेनुसार मुंबई किनारी रस्ता प्रकल्प गणेशोत्सवादरम्यान ६ ते १८ सप्टेंबर या कालावधीत २४ तास वाहतुकीसाठी खुला होता. आता शनिवार २१ सप्टेंबरपासून मुंबई किनारी रस्ता प्रकल्प वाहतुकीसाठी आठवड्यातील सातही दिवस सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. तर, रात्री १२ ते सकाळी ७ या वेळेत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. दक्षिणवाहिनी बिंदूमाधव ठाकरे चौक, रजनी पटेल चौक (लोटस जंक्शन) आणि अमरसन्स उद्यान ते मरीन ड्राईव्ह ही मार्गिका तसेच, उत्तरवाहिनी मरीन ड्राईव्ह, हाजी अली आणि रजनी पटेल चौक (लोटस जंक्शन) ते वांद्रे वरळी सागरी सेतूपर्यंतची (राजीव गांधी सागरी सेतू) मार्गिका वाहतुकीसाठी खुली राहणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.