मुंबई : सागरी किनारा मार्गाची दक्षिण दिशेची बाजू मंगळवारपासून सर्वसामान्यांसाठी खुली होणार असली तरी या मार्गावरून अवजड वाहनांसह दुचाकी, तीनचाकी वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. वाहनांवर ताशी ८० किमी वेगमर्यादा घालण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारा रस्ता प्रकल्पातील प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंतचे बांधकाम सुरू आहे. प्रकल्पाचे ८६ टक्के काम पूर्ण झाले आहे. एकूण १०.५८ किलोमीटर लांबीच्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पापैकी वरळी ते मरीन ड्राईव्हपर्यंतची नऊ किलोमीटर लांबीची मार्गिका सुरू होणार आहे. या मार्गावर मंगळवारपासून मोठ्या संख्येने वाहने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने वाहतूक विभागाच्या मदतीने त्याचे नियोजनही केले आहे.
सुरक्षेचे निर्देश
ही मार्गिका सुरू करण्यासाठी वाहतूक विभागाने प्रक्रिया पूर्ण करून आदेश काढावेत, याकरिता पालिकेच्या सागरी किनारा मार्ग विभागाने वाहतूक विभागाला पत्र पाठविले आहे. वाहतूक विभागाच्या निर्देशानुसार पालिकेने या मार्गावर ठिकठिकाणी सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी सुरक्षा रक्षक, टोईंग व्हॅनचा बंदोबस्त करण्याचे निर्देश संबंधित कंत्राटदारांना दिले आहेत. वांद्रे- वरळी सागरी सेतूवर प्रवेश असलेल्या वाहनांनाच प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे नव्याने सुरू झालेल्या मार्गिकेवरूनही दुचाकी, तीनचाकी आणि अवजड वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही.
हेही वाचा – आमदार भास्कर जाधवांचे मुलाच्या उमेदवारीसाठी दबाव तंत्र ?
हेही वाचा – राज्यात पुन्हा १० हजार शिक्षकांची भरती, कोणत्या महिन्यात होणार टीईटी? जाणून घ्या…
येथून प्रवेश…
सागरी किनारा मार्गावर वरळीतील बिंदुमाधव ठाकरे चौक, रजनी पटेल चौक आणि भुलाबाई देसाई रोड येथून प्रवेश करता येणार आहे, तर अमरसन्स गार्डन, भुलाबाई देसाई रोड व मरीन ड्राईव्ह येथे बाहेर पडण्यासाठी मार्ग आहेत.