तांबे चौकातील कोंडी टाळण्यासाठी पहिल्या टप्प्याच्या मार्गात बदल
नरिमन पॉइंट ते कांदिवली दरम्यान होऊ घातलेल्या सागरी मार्गाच्या पहिल्या टप्प्यात फेरबदल करण्यात आले असून मलबार हिल खालून जाणारा बोगदा आता तांबे चौकाऐवजी गिरगाव चौपाटीवरील ‘एच२ओ’जवळून सुरू होणार आहे. त्यामुळे तांबे चौकात भविष्यात होणाऱ्या संभाव्य वाहतूक कोंडीचा प्रश्न निकालात निघणार आहे.
नरिमन पॉइंट ते कांदिवली दरम्यानचा सागरी मार्ग पश्चिम उपनगरात जाण्या-येणाऱ्या मुंबईकरांसाठी खुश्कीचा मार्ग ठरणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी पालिकेने आंतरराष्ट्रीय निविदा मागविल्या आहेत. नरिमन पॉइंट येथील सुरू होणाऱ्या या मार्गात मलबर हिल आणि जुहू चौपाटी येथे अशा दोन बोगद्यांचा समावेश असणार आहे. त्यापैकी पहिला मलबार हिल येथील बोगद्याचे काम पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात येणार आहे. हा बोगदा चौपाटीनजीक मलबार हिलच्या पायथ्याशी असलेल्या तांबे चौकापासून सुरू होणार होता. मात्र मलबार हिल आणि पेडर रोड येथे जाणारी वाहने या चौकातून जातात. बोगद्यामुळे या चौकात वाहतूक कोंडी होऊन वाहतूक कोंडीची नवी समस्या निर्माण होण्याची शक्यता लक्षात आल्याने सागरी मार्गाच्या रचनेत काही बदल करण्यात आले आहेत. पूर्वी तांबे चौकाजवळील अनेक इमारती या बोगद्याआड येत होत्या. आता केवळ तीन इमारती बोगद्याच्या मार्गात येत असून या इमारतींच्या रहिवाशांचा प्रश्न चर्चेतून सोडविण्यात यश मिळेल, असे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
सागरी मार्गावरून शहरात इतरत्र जाण्यासाठी ठिकठिकाणी मार्गिका उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे या मार्गावरून शहरात कुठेही झटपट पोहोचता येईल. तसेच या मार्गावर १६१ हेक्टर जागेत उद्यान उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर १० ते १२ कि.मी. लांबीचा सायकल मार्गही उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच हाजी अली दग्र्याला कोणतीही अडचण ठरू नये याची काळजी घेण्यात आली आहे.
डॉ. संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका
‘एमएमआरडीए’चा अडथळा
सागरी मार्गासाठी आंतरराष्ट्रीय निविदा काढण्यात आल्या असल्या तरी अद्याप हा मार्ग सागरी सेतूला जोडण्याची परवानगी एमएमआरडीएकडून पालिकेला मिळालेली नाही. केंद्र सरकारकडून सागरी मार्गासाठी पर्यावरणविषयक परवानगी कमी अवधीत मिळवून दिल्याचा ढोल राज्य सरकार वारंवार वाजवत आहे. पण मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित असलेल्या एमएमआरडीएकडून सागरी मार्ग सागरी सेतूला जोडण्याची परवानगी अद्यापही पालिकेला मिळवून देण्यात सरकार अपयशी ठरले आहे.
असे असतील बदल
* तांबे चौकाऐवजी गिरगाव चौपाटीमध्ये असलेल्या ‘एच२ओ’जवळून सागरी मार्गाचा बोगदा सुरू होईल. त्यामुळे नरिमन पॉइंट येथून पश्चिम उपनगरात जाणारी वाहने गिरगाव चौपाटीवरूनच बोगद्यात प्रवेश करतील.
* सागरी मार्ग पुढे नेपिअन्सी रोड येथील प्रियदर्शनी पार्कजवळून हाजी अलीवरून वरळी येथे सागरी सेतूला जोडण्यात येणार आहे.
* वरळी येथून पुढे वांद्रे किल्ल्याजवळून खारदांडा गावाला जोडण्यात येणार आहे. खारदांडा ते जुहू किनाऱ्यापर्यंत ७०० मीटर लांबीचा बोगदा खोदण्यात येणार असून तो समुद्राखालून २४ मीटर खोलीवर असणार आहे.
प्रसाद रावकर