छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर कपड्यांचे बटण, पाकिटांमध्ये दडवून आणलेले दीड किलो कोकेन सीमाशुल्क विभागाने जप्त केले. याप्रकरणी दिल्लीत राहणाऱ्या प्रवाशाला सीमाशुल्क विभागाने अटक केली. जप्त केलेल्या अंमली पदार्थांची किंमत १५ कोटी रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.
हेही वाचा- ‘त्या’ प्रवाशाचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलीस पोहोचले मुंबईत
इथोपियाची राजधानी अदिस अबाबा येथून एक प्रवासी अंमलीपदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे सीमाशुल्क विभागाने गुरूवारी छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर सापळा रचला होता. संशयीत प्रवासी आल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन त्याच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. बॅगेतील महिलांच्या कपड्यांच्या बटणांमध्ये तसेच पाकिटांमध्ये संशयीत भुकटी सापडली. तपासणी केली असता ते कोकेन असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत १५९६ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले. याप्रकरणी अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून सीमाशुल्क विभागाने आरोपी प्रवाशाला अटक केली. अंकित सिंह असे आरोपीचे नाव असून तो दिल्लीतील मेहरोली येथील रहिवासी आहे.
एका नातेवाईकाच्या मित्राने अदिस अबाबा येथे ही बॅग त्याला दिली होती, असे अंकितने चौकशीत सांगितले. ती बॅग घेऊन अंकित मुंबईत आला होता. बॅग संबंधित व्यक्तीला देण्यापूर्वीच त्याला मुंबई विमातळावर अटक झाली. याप्रकरणी इतर आरोपींची ओळख पटली असून त्यांचा शोध सुरू आहे. आरोपीने यापूर्वीही अशा प्रकारे कोकेनची तस्करी केली होती. याबाबत सीमाशुल्क विभागातील अधिकारी अधिक तपास करीत आहेत.