मुंबईः सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावर केलेल्या कारवाईत एक किलो ७८९ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या कोकेनची किंमत सुमारे १८ कोटी रुपये असून या प्रकरणी एका परदेशी महिलेला अटक करण्यात आली आहे. या महिलेला कोकेन दिल्लीमध्ये पोहोचवायचे होते, त्यासाठी तिला एक लाख केनियन शिलिंग (सुमारे ६६ हजार रुपये) देण्याचे आरोपींनी मान्य केले होते. पण त्यापूर्वीच तिला अटक झाली. या प्रकरणी मुख्य आरोपीची ओळख पटली असून त्याचा शोध सुरू आहे.

केनियातून एक महिला प्रवासी अंमली पदार्थांची तस्करी करणार असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावर मंगळवारी सापळा रचला होता. संशयित महिला प्रवासी नैरोबीहून दोहामार्गे मुंबईत आली. त्यानंतर तिला संशयावरून सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी थांबवले. महिला अधिकाऱ्यांनी तिची झडती घेतली. त्यावेळी तिच्याकडी बॅगेत एक किलो ७८९ ग्रॅमची पांढऱ्या रंगाची भुकटी सापडली. तपासणीत ते कोकेन असल्याचे निष्पन्न झाले.

कोकेन लपवण्यासाठी विशेष कप्पा

आरोपी महिला इमिली कानिनी रोधा हिने कोकेन लपवण्यासाठी तिच्या बॅगेत विशेष कप्पे बनवले होते. त्यात सीमाशुल्क विभागाला एकूण एक किलो ७८९ ग्रॅम कोकेन सापडले. त्याची किंमत १७ कोटी ८९ लाख रुपये असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाकडून देण्यात आली. इमिली कानिनी रोधा हिच्या विरोधात या प्रकरणी अमली पदार्थ विरोधी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तिला याप्रकरणी अटक करण्यात आली.

दिल्लीला जाणार होते कोकेन

इमिली कानिनी रोधा या महिला प्रवाश्याकडून जप्त करण्यात आलेले कोकेन तिला दिल्लीला घेऊन जाण्यास सांगण्यात आले होते. तेथे पोहोचल्यावर तिला एक लाख केनियन शिलिंग (सुमारे ६६ हजार रुपये) मिळणार होते, पण त्यापूर्वीच तिला मुंबई विमानतळावर अटक झाली. मिलिसन्ट नावाच्या महिलेने तिला संबंधित कोकेन दिले होते, तसेच तिचे विमानप्रवासाचे तिकीटही याच महिलेने नोंदवले होते. मिलिसन्टच्या सांगण्यावरून ती दिल्लीला जाणार होती. तेथे तिला कोकेन ज्या व्यक्तीला द्यायचे होते, त्याची माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली आहे. सीमाशुल्क अधिकारी त्याचा शोध घेत आहेत. या संपूर्ण प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय टोळी असल्याचा संशय सीमाशुल्क विभागाला आहे.

पैशांच्या गरजेपोटी…

आरोपी महिला इमिली कानिनी रोधा हिला पैशांची आवश्यकता होती. त्यामुळे तिने कोकेन तस्करी करण्याचे मान्य केले. या प्रकरणी सीमाशुल्क विभागाने तिला कोकेन सुपूर्त करणारी महिला मिलिसन्ट विरोधातही अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.