मुंबई : परीक्षेसंबंधित विविध कारणांमुळे त्रस्त असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आता वसतिगृहांच्या खाणावळींमधील अस्वच्छता आणि जेवणाच्या निकृष्ट दर्जामुळे मनःस्ताप सहन करावा लागत आहे. कलिना संकुलातील कर्मवीर भाऊराव पाटील मुलांच्या वसतिगृहातील एका विद्यार्थ्याच्या नूडल्समध्ये झुरळ सापडले. त्यामुळे, विद्यापीठाच्या वसतिगृहातील खाणावळींमधील अन्नाच्या दर्जाबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.
मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील वसतिगृहांमधील खाणावळींमध्ये पुरेशी स्वच्छता नसून खाद्यपदार्थ बनविण्याकरिता वापरण्यात येणारे साहित्य निकृष्ट दर्जाचे असते. त्यामुळे, वसतिगृहात विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या जेवणात अनेकदा डास, माशा सापडतात, अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) पथकाने अलीकडेच वसतिगृहातील खाणावळीला भेट देत अन्नाचे नमुने ताब्यात घेतले होते. मात्र, अद्यापही या तपासणीचा अहवाल आलेला नाही. वसतिगृहांच्या खाणावळींतील अस्वच्छता आणि जेवणाच्या निकृष्ट दर्जाबाबत वसतिगृह अधिक्षक असो किंवा विद्यापीठ प्रशासनातील अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करूनही परिस्थितीत अद्याप बदल झालेला नाही.
हेही वाचा >>> विशाळगड प्रकरणाबाबत वादग्रस्त पोस्ट अपलोड करणाऱ्याला अटक
विद्यार्थ्यांचे म्हणणे काय?
‘कलिना संकुलातील वसतिगृहांमधील खाणावळींमध्ये नेहमीच अस्वच्छता असते. विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या ताटात डास, झुरळ, माशा प्लॅस्टिक व रबर बँड, नायलॉनचे धागे आढळतात. नुकतेच नूडल्समध्ये झुरळ सापडले. मात्र, तक्रार केल्यास त्याचा परिणाम शैक्षणिक वर्षावर होईल अशा धास्तीने विद्यार्थी लेखी तक्रार करण्यास धजावत नाहीत. तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यांवरच अनेकदा दबाव येतो, त्यांची सतत चौकशी केली जाते. वसतिगृह अधिक्षकच अतिरिक्त कार्यभार पाहत आहेत. भोगवठा प्रमाणपत्राअभावी वसतिगृहांमधील खाणावळींबाबत अधिकृत निविदा काढण्यात आलेले नाही. प्रभारी कुलसचिवांनी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या, मात्र अद्यापही परिस्थिती जैसे थे आहे’, अशी खंत कर्मवीर भाऊराव पाटील मुलांच्या वसतिगृहातील एका विद्यार्थ्याने व्यक्त केली.
हेही वाचा >>> सदनिकेच्या नावाखाली ७५ जणांची ६६ कोटींची फसवणूक; दोघांविरोधात गुन्हा दाखल
विद्यापीठाचे म्हणणे काय?
‘कर्मवीर भाऊराव पाटील मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार उपाहारगृहातील अन्न पुरवठा करणारा कंत्राटदारही बदलण्यात आला. मात्र, याबाबत एकच विद्यार्थी याबाबत तक्रार करतो. त्यामुळे संबंधित एका विद्यार्थ्याची चौकशी करू. तसेच वसतिगृहामध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी करावी, अशी आम्ही पत्राद्वारे विनंतीही केली आहे. उपाहारगृहातील जेवणाचा उत्तम दर्जा राखण्यावर आमचे लक्ष आहे’, असे मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड यांनी स्पष्ट केले.