मुंबई : लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी वेफर्स, बिस्कीट्स, चॉकलेट्स अशा पदार्थांच्या पाकिटांबरोबर छोटी छोटी खेळणी देण्याचा प्रकार वाढला आहे. मुलांना खेळणी मिळत असल्याने मुलेही खाऊ घेण्यासाठी पालकांच्या मागे लागतात. आजपर्यंत या खाऊच्या पाकिटांबरोबर विविध प्रकारचे बाहुल्या, गाड्या, कार्टूनपटातील पात्रे अशी खेळणी मिळत होती. मात्र एका नामांकित कंपनीच्या खाऊच्या पाकिटात चक्क शवपेटी मुलांना खेळण्यासाठी देण्यात आली आहे. पालकांकडून या प्रकाराबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.

काही वर्षांपूर्वी एका चॉकलेट कंपनीने त्यांच्या चॉकलेटसोबत लहान मुलांना छोटी छोटी खेळणी देण्यास सुरुवात केली. त्या कंपनीच्या उत्पादनाला मुलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. हे चॉकलेट महाग असले तरी अनेक पालक मुलांच्या हट्टापायी त्यांना हे चॉकलेट घेऊन देत असे. चॉकलेट कंपनीच्या या क्लुप्तीला मिळत असलेला प्रतिसाद पाहून काही चिप्स, बिस्कीटांबरोबर छोटी छोटी खेळणी देण्यास सुरुवात केली.

खाऊपेक्षाही त्याबरोबर मिळणाऱ्या छोट्या खेळण्याचे आकर्षण मुलांना वाटते आणि पालकांनी खाऊ घेऊन देण्यास कितीही नकार दिला तरी ते खाऊची पाकिटे घेण्याचा हट्ट करतात. या कंपन्यांकडून सुरुवातीला छोट्या बाहुल्या, स्पायडर मॅन, गाड्या, अशी खेळणी मिळत असत. मात्र हळूहळू त्याची जागा बंदुका, तलवारी अशा हिंसक प्रवृतीची खेळणी देण्यास सुरुवात झाली. मात्र आता एका स्नॅक्सच्या पाकिटात चक्क ‘शवपेटी’ ची प्रतिकृती खेळणे म्हणून मुलांच्या हाती ठेवण्यात आली आहे. त्यामुळे पालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

शवपेटी घेऊन मुलांनी नेमके काय खेळणे अपेक्षित आहे, असा प्रश्न पालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत बंदुका, तलवारी दिल्या जात होत्या. खरेतर लहान मुलांच्या हाती खेळणे म्हणून हत्यारांच्या प्रतिकृती देणेही चुकीचे आहे. आता शवपेटी खेळणे म्हणून दिले तर त्यात नवल काय बिघडले अशी भावना या कंपन्यांची झाली असल्याचे दिसते, अशी प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली.

लहान मुलांच्या खाऊच्या पॅकेटमध्ये ‘शवपेटी’ मिळणं, हा केवळ गमतीचा भाग नाही. ही एक भावनिक चूक आहे. शवपेटी हे कोणत्याही परिस्थितीमध्ये खेळणे असू शकत नाही. त्यामुळे आयुष्याची अखेर हा १खेळ१ असू शकत नाही, अशा भावना पालकांकडून व्यक्त होत आहेत.

मुलांच्या हातात जीवनाची उमेद असणे आवश्यक आहे. तो त्यांचा हक्क आहे. त्यांच्या हातात शवपेटी नव्हे, तर स्वप्ने आणि भावना असाव्यात, असे मत काही पालकांनी व्यक्त केले.