दोन-तीन दिवसांपूर्वी मुंबईकरांना भरलेली हुडहुडी कमी झाली होती. मुंबईच्या एरवीच्या हवामानाप्रमाणेच रात्री घरी पंखे लावून झोपावे लागत होते. परंतु, गुरुवारी रात्रीपासून पुन्हा हवेत गारवा आला आणि मुंबईकर काहीसे सुखावले. शुक्रवारी सकाळपासूनच मुंबई तसेच उपनगरांमध्ये तसेच ठाणे-डोंबिवली-कल्याण परिसरांमध्ये हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला होता. त्याचबरोबर थंडगार वाऱ्यामुळे अजूनही मुंबईत थंडी आहे तर.. याची जाणीव मुंबईकरांना झाली.
मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पुन्हा एकदा स्वेटर विक्रेत्यांकडे स्वेटर खरेदी करण्यासाठी गर्दी दिसून आली. संध्याकाळी नोकरीवरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांची लोकलमध्येही आज केवढा गार वारा सुटलाय याचीच चर्चा रंगली होती. त्यामुळे लोकलच्या दरवाजात एरवी वारा खाण्यासाठी उभे राहणारे लोकही झोंबणाऱ्या वाऱ्यामुळे आत सरकले.
गुरुवारी रात्री ९ वाजता कुलाबा येथे किमान तापमान १९.९ सेल्सिअस अंश तर सांताक्रूझ येथे १५.९ सेल्सिअस अंश तापमान नोंदले गेले. शुक्रवारी संध्याकाळी दक्षिण मुंबईतील समुद्राजवळच्या अनेक ठिकाणी प्रंचड सोसाटय़ाच्या थंडगार वाऱ्यात वाफाळलेला चहा पिण्याची मजा मुंबईकर चाकरमान्यांनी लुटली. झोंबणारा सोसाटय़ाचा वारा खाताना अनेकांना ‘झोंबतो गारवा..’ या गाण्याचीच आठवणी झाली.

Story img Loader