मुंबई: परतीच्या पावसाला जाण्यास विलंब लागल्याने ऑक्टोबर महिन्यातील उष्णतेपासून मुंबईकरांना दिलासा मिळाला. मात्र, ऑक्टोबर अखेरीस मुंबईच्या कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे. हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्राने सरासरी ३५.४ अंश सेल्सिअस आणि कुलाबा केंद्राने सरासरी ३४.५ अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदवले गेले आहे. त्यामुळे मुंबईकरांना दुपारच्यावेळी उकड्याला सामोरे जावे लागत आहे.
मोसमी पाऊस माघारी परतल्यानंतर आठवड्याभरानंतर कमाल तापमानात फारशी वाढ झाली नाही. मात्र, दिवाळीनंतर मुंबईच्या तापमानात वाढ होताना दिसत आहे. मुंबईत ऑक्टोबर महिन्यात ३४ अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमान अपेक्षित असते. मात्र रविवारी मुंबईचे कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले. तर, सोमवारी ३५.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.
हेही वाचा >>> मुंबई: दसरा-दिवाळीत घरविक्री स्थिर; ऑक्टोबरमध्ये मुंबईत ८२०२ घरांची विक्री
पहाटे हुडहुडी, दुपारी घामाच्या धारा
मुंबईतील कमाल आणि किमान तापमानात तब्बल १४ ते १५ अंश सेल्सिअसचा फरक दिसून येत आहे. त्यामुळे मुंबईत पहाटे हुडहुडी आणि दुपारी घामाच्या धारा असे वातावरण तयार झाले आहे. किमान तापमान २० अंश सेल्सिअसवर स्थिरावले असल्याने सकाळपर्यंत मुंबईतील बऱ्याच ठिकाणी गारवा जाणवत आहे. थंडीच्या कालावधीत आणि पावसाच्या हंगामानंतरच्या दिवसांत तापमानात वाढ होताना दिसून येते. त्यामुळे गेल्यावर्षी जानेवारी आणि फेब्रुवारी या थंडीच्या कालावधीत तापमानात ०.७८ अंश सेल्सिअसची वाढ होती. मोसमी पावसाच्या हंगामानंतरचा थंडीचाच कालावधी असलेल्या ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांत तापमानात ०.४२ अंश सेल्सिअसची वाढ होती.