गेल्या काही दिवसांपासून उकाडय़ाने हैराण झालेल्या मुंबईकरांना पुन्हा एकदा गुलाबी थंडीचा अनुभव येत आहे. पारा घसरल्याने रविवार सकाळपासूनच गार वाऱ्यांनी मुंबईकरांचे स्वागत केले. संध्याकाळी तर हे गार वारे अक्षरश: बोचत होते. अखेर रविवारची रात्र या मोसमातील सर्वात थंड रात्र ठरली. या रात्री सांताक्रुझ येथे किमान तापमान १४.४ अंश एवढे नोंदवले गेले.
डिसेंबरच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये थंडीने दडी मारली होती. त्यामुळे मुंबईकर उन्हाळ्याच्या भीतीने धास्तावले होते. मात्र, उत्तर भारतात आलेली थंडीची लाट नर्मदेपार आली आणि मुंबईलाही भिडली. गेल्या दोन दिवसांतच मुंबईच्या किमान तापमानाचा पारा तब्बल चार ते पाच अंशांनी खालावला. रविवारी किमान तापमान १४.४ अंश एवढे नोंदवले गेले.
उत्तरेत ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’मुळे थंडीची लाट आली आहे. उत्तरेकडून येत असलेल्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील तापमानही खाली उतरले आहे. पुढील दोन दिवस गारवा कायम राहणार आहे.
– व्ही. के. राजीव,
हवामानशास्त्र विभागाचे संचालक
गेल्या वर्षी ६ जानेवारीला
१०.४ अंश सेल्सियस एवढे तापमान नोंदवले गेले होते. हे तापमान १० अंश सेल्सिअस एवढे होते. जानेवारी महिन्यातील सर्वात कमी तापमान हे २२ जानेवारी १९६२ रोजी ७.४ अंश सेल्सियस एवढे होते.