जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ापासून सुरू असलेल्या थंड वाऱ्यांचा ओघ सुरूच राहिला असून शनिवारी सकाळी थंडीने मोसमातील आणखी एक नीचांक गाठला. सांताक्रूझ येथील वेधशाळेत शनिवारी १३.२ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. रविवार व सोमवारही गारठलेले असतील, असे वेधशाळेकडून सांगण्यात आले. दरम्यान थंड वाऱ्यांमुळे भर दुपारच्या उन्हातील ऊबही हरवली होती.
उत्तर भारतातून अव्याहतपणे येत असलेल्या थंड वाऱ्यांच्या प्रभावाने मुंबईकरांना गेले काही दिवस गुलाबी थंडीचा अनुभव येत आहे. आठवडाभर १५ अंश सेल्सिअसच्या पुढे मागे किमान तापमान रेंगाळत असून शनिवारी तापमापकातील पाऱ्याने आणखी खाली जात १३.२ अंश से.ची पातळी गाठली. राज्यातील सर्वात कमी तापमान नाशिक येथे ६ अंश सेल्सिअस होते. दरम्यान विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला असून रविवारी मराठवाडय़ातील काही भागात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
उत्तरेकडे होत असलेली बर्फवृष्टी आणि वाऱ्याची उत्तर दक्षिण दिशा यामुळे हा गारठा आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज मुंबई वेधशाळेने व्यक्त केला आहे. सकाळी गारठवणारे थंड वारे दुपारीही उन्हाचे चटके कमी करत आहेत. शनिवारी कुलाबा व सांताक्रूझ या दोन्ही ठिकाणी कमाल तापमान ३० अंश से. खालीच राहिले. कुलाबा येथे २७.८ अंश से व सांताक्रूझ येथे २९.३ अंश से. कमाल तापमान होते.
या मोसमातील थंड दिवस (तापमान अंश से.)
१८ जानेवारी – १३.२
११ जानेवारी – १३.६
६ जानेवारी – १४.४
२२ डिसेंबर – १४.८
१६ डिसेंबर – १५.६
दहा वर्षांतील कमी तापमान
२९ जानेवारी २०१२- १० अंश से.
सर्वात कमी तापमान
२२ जानेवारी १९६२- ७.४ अंश से.