मुंबई : उत्तरेत आलेल्या थंड लाटेचा परिणाम म्हणून विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाटसदृश स्थिती निर्माण झाली आहे. नगरमध्ये सर्वात कमी ६.४, नागपुरात सात तर परभणीत ८.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने सोमवारी (१६ डिसेंबर) उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हिमालयीन रांगांमध्ये पश्चिमी थंड वारे सक्रिय आहेत. त्यामुळे जम्मू आणि काश्मीर, लेह लडाखमध्ये मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होत आहे. मध्य आशियातून थंड हवेचा झंझावात वेगाने भारताच्या दिशेने येत असल्यामुळे उत्तर भारत व्यापून थेट मध्य प्रदेशपर्यंत थंडीची लाट पसरली आहे. त्याचा परिणाम म्हणून उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत तापमान सहा अंशांपर्यंत खाली आले आहे.
राज्यात रविवारी नगरमध्ये ६.४ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. नगर खालोखाल जळगावात ७.९, पुण्यात ९.०, मराठवाड्यातील परभणीत ८.६, छत्रपती संभाजीनगरमध्ये ८.८, विदर्भातील नागपुरात ७.०, गोंदिया ७.२, वर्धा ७.४ आणि अकोल्यात ९.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. राज्याच्या अन्य भागात किमान तापमान दहा अंशांच्या वर राहिले. किनारपट्टीवर कुलाब्यात २२.४, सांताक्रुजमध्ये १६.३ आणि डहाणूत १६.० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.
थंडीच्या लाटेचा इशारा
उत्तरेकडून वेगाने येत असलेल्या थंड वाऱ्यामुळे राज्याच्या काही भागांत थंडीची लाटसदृश स्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी (१६ डिसेंबर) गोंदिया, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नगर, जळगावात थंडीची लाट किंवा लाटसदृश स्थिती निर्माण होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे सोमवारीही राज्यातील अनेक भागांत थंडी वाढण्याचा अंदाज आहे. त्यानंतर दक्षिणेकडून बाष्पयुक्त वारे येतील आणि किमान – कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होईल, असे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी म्हटले आहे.