उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढल्यामुळे मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढला. शनिवारी राज्यात अनेक ठिकाणी तापमानात मोठी घसरण झाली. पुण्यात चोवीस तासांत पारा पाच अंशांनी घसरला. तर मुंबई, ठाण्यातही शनिवारी सकाळी १३.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. विशेष म्हणजे, शनिवारी भर दुपारीही मुंबईत कमाल तापमान २५.५ अंशावर होते आणि थंड वाऱ्यांनी मुंबई-ठाणेकरांना दुपारीही कुडकुडायला लावले.
दिवसभरातील तापमानाचा आलेख हा कमाल (दिवसातील सर्वाधिक) व किमान (सर्वात कमी) तापमानातून समजतो. सकाळी सूर्योदयापूर्वी हवा अधिक थंड असते तर भर दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर सर्वात जास्त गरम होते. मुंबईत जानेवारी सरासरी कमाल तापमान ३०.७ अंश से. तर किमान तापमान १६.८ अंश सेल्सिअस आहे. शनिवारी सकाळी किमान तापमानात तीन अंशांची घसरण झाली, पण त्यानंतरही थंड वाऱ्यांनी मुंबईच्या दिशेने आगेकूच कायम ठेवल्याने कमाल तापमानात तब्बल पाच अंश से.हून अधिक घट झाली. हे वारे कोरडे असल्याने हवेतील बाष्पाचे प्रमाणही घटले. संध्याकाळी कुलाबा येथे अवघी ३७ टक्के तर सांताक्रूझ येथे ४० टक्के सापेक्ष आद्र्रता होती. बाष्प हवेतील उष्णता धरून ठेवते, मात्र कोरडय़ा हवेमुळे थंडीची तीव्रता अधिक वाढली.
कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील तापमानही सरासरीच्या तुलनेत लक्षणीयरीत्या घटले आहे. विदर्भ आणि मराठवाडय़ातील तापमानही सरासरीच्या किंचित खाली आले आहे. त्यामुळे थंडीचा कडाका पुन्हा वाढला आहे. पुणे शहरात शुक्रवारच्या तुलनेत पारा पाच अंशाने घसरून शनिवारी सकाळी ७ अंशांची नोंद झाली.
संक्रांतीपूर्वी थंडीचे प्रस्थान?
देशाच्या उत्तर भागात गार वाऱ्यांच्या नव्या लाटेने प्रवेश केला आहे. याच वाऱ्यांच्या प्रभावाने मुंबईसह राज्यातील तापमान घसरले आहे. आणखी दोन दिवस हा प्रभाव राहील, असे मुंबई हवामानशास्त्र विभागाचे संचालक व्ही. के. राजीव म्हणाले. उत्तर भागात वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे आलेली थंडीची लाट जम्मू-काश्मीरच्या पूर्वेकडे सरकली आहे. ही लाट सरकत असल्याने उत्तरेकडून येत असलेल्या थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढला आणि त्यामुळे राज्यातील तापमानात घट झाली. हा प्रभाव साधारणत दोन दिवस टिकतो, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. रविवारी थंडीचा प्रभाव राहणार असला तरी सोमवारपासून तापमान पुन्हा सरासरीएवढे होईल.

Story img Loader