मुंबई : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यभरात थंडीची चाहूल लागली आहे. किमान तापमान अनेक ठिकाणी २० अंश सेल्सिअसच्याही खाली गेले आहे. पहाटे हवेत गारवा जाणवत आहे. अपवादात्मक ठिकाणे वगळता कमाल तापमानही ३४ अंश सेल्सिअसच्या आत आहे. दक्षिण कोकण आणि दक्षिण- मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तरेकडून राज्यात थंड वारे येत आहेत. त्यामुळे कमाल आणि किमान तापमानात घट झाली आहे. मध्यरात्री आणि पहाटे हवेत गारवा जाणवत आहे. किमान तापमान राज्यात अनेक ठिकाणी २० अंश सेल्सिअसच्याही खाली गेले आहे. तर कमाल तापमान अपवादात्मक ठिकाणे वगळता ३४ अंश सेल्सिअसच्या खाली आहे. मागील दोन दिवसांपासून नाशिक, नगरसह उत्तर महाराष्ट्रात १८ अंश सेल्सिअसपर्यंत पारा आला आहे. मंगळवारी (२९ ऑक्टोबर) महाबळेश्वर येथे १५.४ अंश सेल्सिअस इतक्या सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे.
हेही वाचा :राजकीयदृष्ट्या प्रेरित गुन्ह्यांना आळा घाला, निवडणूक आयोगाचे महासंचालकांना आदेश
उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि हवेतील बाष्प आणि पहाटे कमी होणाऱ्या तापमानामुळे राजाच्या बहुतेक भागात दाट धुके पडत आहे. अनेक ठिकाणी सकाळी आठ वाजेपर्यंत धुके पहावयास मिळत आहे. पुढील काही दिवस धुके कायम राहण्याचा अंदाज आहे.
हलक्या पावसाचा अंदाज
राज्यात उत्तर भारतातून काही प्रमाणात थंड वारे येत आहेत. तर, ईशान्य वारे राज्यावर येताना बंगालच्या उपसागरातून बाष्प सोबत आणत आहेत. या दोन्ही वाऱ्यांचा मिलाफ दक्षिण महाराष्ट्रावर होत आहे. त्यामुळे राज्याच्या काही भागात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. पुढील तीन – चार दिवस दक्षिण कोकण आणि दक्षिण – मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. या भागात विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
दक्षिण कोकण, दक्षिण महाराष्ट्रात पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे पहाटे गारवा जाणवत आहे. ढगाळ वातावरणामुळे पुन्हा तापमान वाढण्याचा अंदाज आहे. दिवाळीनंतरच थंडीला सुरुवात होण्याचा अंदाज आहे. – डॉ. एस. डी. सानप, शास्त्रज्ञ हवामान विभाग