मुंबई : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मुंबईकरांना थंडीची चाहूल लागली. संपूर्ण डिसेंबर महिना ढगाळ वातावरण आणि उकाडा सहन केल्यानंतर शनिवारी मुंबईतील किमान तापमानात घसरण झाली. हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात शनिवारी १७.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.
मुंबईमध्ये दिवसभर उकाडा जाणवतो. तर पहाटे धुके असते. आर्द्रतायुक्त हवेमध्ये प्रदूषके साचून राहिल्याने मुंबईत धुरक्याची स्थिती निर्माण झाली आहे. मागील दोन दिवस ही परिस्थिती कायम आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी मुंबईत आर्द्रता कमी असतानाही किमान तापमानात घट झाली आहे. सांताक्रूझ येथे पहिल्यांदा किमान तापमानात घट नोंदविण्यात आली आहे.
हेही वाचा : ठाकरे गटासमोर जागा राखण्याचे कडवे आव्हान तर भाजपनेही कंबर कसली
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण वगळता इतर भागात किमान तापमानात घट झालेली नाही. उत्तर कोकणावर उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा परिणाम झाल्याने तापमानात घट झाली आहे. दरम्यान, मुंबईतील किमान तापमानात पुन्हा वाढ होऊ शकेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सोमवारी किमान तापमान २१ अंशापर्यंत जाण्याचा अंदाज आहे. तसेच रविवार, सोमवार वातावरण ढगाळ असण्याची शक्यता आहे. राज्यात १० जानेवारीपर्यंत काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर ११ जानेवारीपासून उत्तर भारत आणि ईशान्येकडून येणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्यांमुळे पुन्हा गारठा वाढू लागेल.