मुंबई : ऐन हिवाळ्यात राज्यात कमाल तापमान ३० अंशांवर तर किमान तापमान २० अंशांवर गेले आहे. उष्मा वाढल्यामुळे गेली तीन दिवस असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे. मात्र, सोमवारपासून तापमानात चार ते पाच अंश सेल्सिअसने घट होऊन काहिसा दिलासा मिळणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, फेंगल चक्रीवादळामुळे राज्यात बाष्पयुक्त वारे आल्यामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. हवेत बाष्पाचे किंवा आर्द्रतेचे प्रमाण वाढून उकाडा वाढला होता. नाशिक, नगर, पुण्यात नऊ अंशांवर गेलेले किमान तापमान वाढून थेट १९ अंशांपर्यंत आले होते. तर कमाल तापमान राज्यभरात सरासरी ३० अंशांपर्यंत वाढले होते. आर्द्रता वाढल्यामुळे किमान तापमानात दहा अंश सेल्सिअसने वाढ झाली होती. कमाल तापमानातही सरासरी पाच अंश सेल्सिअसने वाढ झाली होती. त्यामुळे राज्याच्या बहुतांश भागात असाह्य उकाडा जाणवत होता.
हवेतील आर्द्रता हळूहळू कमी होत आहे. पश्चिमी विक्षोप सक्रीय होण्याचा अंदाज आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर वाढून शनिवारपासून (७ डिसेंबर) तापमानात घट होण्यास सुरूवात होईल. सोमवारी (९ डिसेंबर) कमाल – किमान तापमानात चार ते पाच अंश सेल्सिअसने घट होऊन, थंडीत वाढ होईल. त्यामुळे सोमवारपासून राज्यभरात उकाड्यापासून काहिसा दिलासा मिळण्याचा अंदाज आहे, अशी माहिती हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी दिली.
हेही वाचा – मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक
हेही वाचा – मुंबई : मॅरेथॉनसाठी रविवारी विशेष लोकल
कमाल ३४ तर, किमान पारा १७ अंशांवर
राज्यात शुक्रवारी चंद्रपूर येथे सर्वांत कमी १७.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. सोलापूर येथे ३४.७ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे. किनारपट्टीवर मुंबईत ३२.६, सांताक्रुज ३४.४, रत्नागिरी ३४.५ आणि डहाणूत ३०.१ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. किमान तापमान चंद्रपूर खालोखाल नागपुरात २०.६, पुण्यात १९.८, नगरमध्ये २१.५, छत्रपती संभाजीनगरमध्ये २२.० आणि कोल्हापुरात २२.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.