आठवडय़ातील पाच दिवस कॉर्पोरेट क्षेत्रातील गर्दीने गजबजणारा वांद्रे कुर्ला संकुलाचा परिसर शनिवार सकाळपासून मात्र सुरांच्या ओढीने भारला होता. ‘ग्लोबल सिटिझन्स इंडिया’ या संस्थेने आयोजित केलेल्या महोत्सवाचा भाग बनण्यासाठी महाराष्ट्रच नाही तर देशाच्या मोठय़ा शहरांमधून आलेल्या उत्साही तरुणाईने सकाळी नऊ वाजल्यापासूनच गर्दी केली होती. दुपारी दीड वाजता सुरू होणाऱ्या या महोत्सवासाठी तब्बल ८५ हजार ते एक लाख प्रेक्षक जमले होते.
झिंगाट गाण्याने सुरू झालेल्या या महोत्सवात ए. आर. रेहमान, अमेरिकी रॅपस्टार जय जॉय.. शंकर एहसान लॉय अशा एकापेक्षा एक सरस कलावंतांना चाहत्यांचा प्रतिसाद मिळत गेला आणि या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेल्या ‘कोल्डप्ले’ या बॅण्डसाठी रंगमंच सज्ज झाला. क्रिस मार्टिन आणि त्याच्या साथीदारांनी आपल्या जादुई संगीताने लाखभर संगीतवेडय़ांना मोहवून टाकले आणि आपल्या तालावर थिरकायला लावले.
प्रचंड गर्दी असूनही शिस्तबद्ध व उत्कृष्ट नियोजनात कार्यक्रमाला सुरुवात झाली. दीड वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात सैराटच्या गाण्याने धमाल उडवून दिली. त्यानंतर हिंदी चित्रपटातील युवा कलाकार श्रद्धा कपूर, सोनाक्षी सिन्हा, रणवीर सिंग, अर्जुन कपूर यांनीही अदाकारी पेश केली. अर्जित सिंगचे ‘रे कबीरा’ आणि शंकर एहसान लॉय यांची ‘हर घडी बदल रही है’, ‘सबसे आगे होंगे हिंदुस्थानी’, ब्रेथलेस यांच्या गाण्यांनी लोकांनाही ठेका धरायला लावला. शंकर महादेवनने मुंबईच्या मराठीपणाची आठवण जपत ‘मनमंदिरा तेजाने’ हे ‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटातील गाणे सादर केले. तरुणांच्या दोन पिढय़ांनंतरही ‘बॉम्बे’ आणि ‘दिल से’ या चित्रपटातील गाण्यांची जादू कायम असल्याचे रेहमानच्या परफॉर्मन्सने दाखवून दिले.
देशी कलाकारांच्या या अफलातून सादरीकरणानंतर लंडनमधील २० ते २५ वयोगाटीतल तरुणांच्या व्हॅम्प बॅण्डने धमाल उडवून दिली. हिंदी गाण्यांसोबतच पाश्चिमात्य संगीताचीही आवड जोपासणाऱ्या तरुणाईकडून या गाण्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि ‘कोल्डप्ले’च्या सादरीकरणाची हवा तयार झाली.
कार्यक्रम पुढे सरकत गेला तसा ‘कोल्डप्ले’चा पुकारा वाढत गेला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनोगतानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीहून व्हिडियो कॉलद्वारे हजारो तरुणांशी संपर्क साधला. नोबेल पुरस्काराने सन्मानित गायक आणि गीतकार बॉब डिलन यांच्या ‘द टाइम दे आर चेंजिंग’ या काव्यपंक्तींचा उल्लेख करीत देश सध्या बदलत असल्याचे नमूद केले. पंतप्रधानांच्या संदेशानंतर ‘कोल्डप्ले’चा बँड अवतरला आणि मैफलीला पुन्हा सच्चा सूर गवसला.
झिंगाटची झिंग..
कार्यक्रमाची सुरुवातच ‘सैराट’च्या झिंगाट गाण्याने झाली आणि अमराठी तरुणाईही या गाण्यावर सरावाने थिरकली. शंकर महादेवन यांनी ‘मनमंदिरा तेजाने’ हे गीत सादर करून देशी शास्त्रीय संगीताचे अस्तरही या मैफलीस लावले.
बच्चन यांची जादू
अमिताभ बच्चन यांनी शिलाँग कॉयर ग्रुपसह ‘पिंक’ चित्रपटातील ‘तू खुद की खोज में निकल’ ही कविता सादर केली. त्यांच्या भारदस्त आवाजाने शांतता पसरली होती. कविता संपताच टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यानंतर त्यांनी फरहान अख्तरसोबत ‘यारी तेरी यारी’ हे गाणे गायले.