मित्रासह मोटारसायकलीवरून निघालेल्या एका महाविद्यालयीन तरुणीचा बेस्टच्या धडकेत अपघाती मृत्यू झाला आहे. भांडुपच्या लालबबहादूर शास्त्री नगर येथे गुरुवारी दुपारी ही दुर्घटना घडली.
तरण्या कुंदर (१९) ही तरुणी भांडुप स्थानकात जाण्यासाठी बसथांब्यावर उभी होती. तिचा मित्र बालन आनंदराज (२६) याने तिला पाहून रेल्वे स्थानकात सोडण्यासाठी मोटारसायकलीवर बसवले. मनसा हॉटेलजवळ हे दोघे जात असताना मार्गिका बदलून आलेल्या बसने बालनच्या मोटारसायकलीला धडक दिली. त्यात तोल जाऊन बालन खाली पडला. बालन डाव्या बाजूला तर मागे बसलेली तरण्या उजव्या बाजूला पडली. त्याचवेळी मागून  येणाऱ्या दुसऱ्या बेस्टच्या चाकाखाली तरण्या चिरडली गेली. तिचा जागीच मृत्यू झाला. बेस्ट बसचालकाने बस तशीच पुढे नेली. बालन याला किरकोळ दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तरण्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या अज्ञात बेस्ट चालकाविरोधात भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.