आयआ़टी प्रवेशाचा निकष ठरणाऱ्या ‘जेईई अॅडव्हान्स्ड’ प्रवेशपरीक्षेत काही मुले तयारीअभावी अपयशी ठरतात, तर काहींना अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यामुळे हव्या त्या विद्याशाखेत प्रवेश मिळत नाही. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षणापासून एक-दोन वर्षांचा ब्रेक घेऊन केवळ आयआयटी प्रवेशपरीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अलीकडे वाढू लागली आहे. याची दखल घेत आयआयटी-प्रवेशपरीक्षांची तयारी करून घेणारे खासगी शिकवणीवर्ग रीपीटर विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बॅचेस, ज्यादा लेक्चर्स यासारख्या पॅकेजेसची ऑफर देऊ लागले आहेत.
आयआयटी प्रवेशाचे लक्ष्य खूप आधीपासून निश्चित केलेल्या देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये दिल्ली, राजस्थान, आंध्र प्रदेशातील विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे आयआयटी प्रवेशपरीक्षेची तयारी करणाऱ्या रीपीटर्सची संख्याही अर्थातच या राज्यांमध्ये अधिक आहे. गेल्या वर्षीच्या यासंबंधीच्या निकालावर नजर टाकली तर असे दिसून येते की, यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये ६३ टक्के रीपीटर्स तर ३७ टक्के पहिल्या प्रयत्नांत यशस्वी ठरणारे विद्यार्थी होते.
महाराष्ट्रात गेल्या चार वर्षांत आयआयटी प्रवेशपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. तरीही, एकूणात ही संख्या पाच ते सहा टक्क्य़ांच्या आसपास, म्हणजे, ५०० ते ६०० इतकीच आहे. मात्र आयआयटी प्रवेशपरीक्षेत पहिल्या प्रयत्नात यशस्वी झालेल्यांचे प्रमाण अधिक आहे तर रीपीटर्सचे कमी असल्याचे पुण्याच्या आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्राचे संचालक दुर्गेश मंगेशकर यांनी नमूद केले. आयआयटीच्या प्रवेशजागा वाढल्या, तशी प्रवेशासाठी स्पर्धाही वाढली. त्यामुळे आयआयटीचे लक्ष्य गाठण्यासाठी तयारीही तितकीच ‘फोकस्ड’ लागते. आणि त्यासाठी मुले ब्रेक घेऊन या परीक्षेच्या तयारीला वेळ देतात. कारण या परीक्षेला बुद्धिमत्ता आणि तगडी मेहनतही आवश्यक असते. पहिल्या प्रयत्नांत एकूणच परीक्षेचे स्वरूप, अभ्यासाची तयारी याचा मुलांना योग्य अंदाज येतोच, असे नाही. म्हणूनच प्रवेशपरीक्षा तितकीशी चांगली गेली नाही, हे लक्षात आल्यावर निकालाच्या आधीच विद्यार्थी क्रमिक अभ्यासातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेत पुन्हा आयआयटी प्रवेशाच्या तयारीला लागतात, असे आयआ़टी प्रवेश परीक्षांचे मार्गदर्शक विवेक खन्ना म्हणाले. अशा प्रकारे आयआयटी प्रवेशपरीक्षेसाठी घेतलेल्या ब्रेकला पालकांचाही पाठिंबा मिळत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा