एका महाविद्यालयीन तरुणीची पाच जणांच्या टोळक्याने भर रस्त्यात छेडछाड केल्याची धक्कादायक घटना चारकोप येथे घडली. भर रस्त्यात तब्बल पंधरा मिनिटे छेडछाडीचा हा प्रकार सुरू होता, मात्र तिच्या मदतीला कुणी आले नाही. गस्तीवर असणाऱ्या एका पोलिसाच्या मदतीने या मुलीची सुटका झाली. चारकोप पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे.
मालवणी येथे राहणारी ही १७ वर्षीय तरुणी सोमवारी संध्याकाळी आपल्या मैत्रिणीसमवेत रिक्षाने जात होता. त्यांची रिक्षा चारकोपच्या जनकल्याण नगर येथे आली असता तिची मैत्रिणी पैसे आणण्यासाठी घरी जाते, असे सांगून घरी गेली. मात्र ती परतलीच नाही. बराच वेळ मैत्रिण न आल्याने रिक्षावाल्याने तिच्याकडे पैसे मागण्यास सुरुवात केली. त्यांच्यात वादावादी सुरू असताना तिथे आलेल्या काही तरुणांनी तिची छेड काढण्यास सुरुवात केली. भररस्त्यात त्यांनी तिचे कपडे ओढणे, शरीराला स्पर्श करणे आदी प्रकार सुरू केले. ही तरुणी एका हॉटेलमध्ये आश्रयाला गेली पण त्यानेही हॉटेलचे शटर ओढून घेतले. या वेळी ती असहायपणे रस्त्यावरून रडत होती. मात्र कुणीही मदतीला आले नाही. चारकोप पोलीस ठाण्याचे एक पोलीस हवालदार गस्तीवरून जात असताना त्यांनी तिची चौकशी केली आणि एका आरोपीला अटक केली.  त्याच्या माहितीवरून अन्य दोघांना अटक केली. फैयाज खान (२०), नौशाद खान (२४), सरोज खान (२०) ही आरोपींची नावे आहेत. अन्य दोन अल्पवयीन आरोपी फरार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद कोळी यांनी सांगितले.

Story img Loader