परीक्षेच्या कामात सहभागी न होणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाईचा बडगा उगारण्याच्या मुंबई विद्यापीठाच्या इशाऱ्याला न जुमानता आपले बहिष्कार आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय ‘बॉम्बे युनिव्र्हसिटी अॅण्ड कॉलेज टीचर्स युनियन’ने (बुक्टू) घेतला आहे. इतकेच नव्हे तर आपल्या मागण्या मान्य न झाल्यास ८ मार्चपासून ‘एमफुक्टो’ या प्राध्यापकांच्या राज्यस्तरीय संघटनेसोबत ‘जेलभरो’ आंदोलनात सहभागी होऊन बुक्टू आपला लढा अधिक तीव्र करणार आहे. त्यामुळे, विद्यापीठाच्या परीक्षांवर अनिश्चिततेची टांगती तलवार कायम आहे.
बुक्टू ही मुंबई विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयातील तब्बल चार हजार प्राध्यापकांची संघटना आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी संघटनेने विद्यापीठाच्या सर्व प्रकारच्या परीक्षांवर बहिष्कार टाकला आहे. मात्र, बहुतांश प्राध्यापकांचा सहभाग आणि सहकार्य नसताना परीक्षा रेटून नेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतल्याने सध्या पदवी महाविद्यालयांमध्ये तणावाच्या वातावरणात प्रात्यक्षिक परीक्षा पार पडत आहेत.
बहुतेक महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांच्या असहकारामुळे प्रात्यक्षिक परीक्षा पार पडलेल्या नाहीत. या विद्यार्थ्यांच्या परीक्षा नंतर घेतल्या जातील, असे विद्यापीठाच्या वतीने स्पष्ट केले गेले असले तरी लेखी परीक्षेचे काय, असा प्रश्न आहे. कारण, लेखी परीक्षा या प्राध्यापकांच्या सहभागाशिवाय घेणे अशक्य आहेत. त्यामुळे, आता विद्यापीठाने कडक धोरण अवलंबवायचे ठरविले असून प्रात्यक्षिक परीक्षेचे काम नाकारणाऱ्या प्राध्यापकांवर ‘महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियमा’तील कलम ३२ (५)(छ)नुसार कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्राचार्याना काम न करणाऱ्या शिक्षकांची नावे व दैनंदिन परीक्षा कामाचा अहवाल पाठविण्याचे आदेश देण्यात आल्याचे परीक्षा नियंत्रक दीपक वसावे यांनी दिला आहे.
दरम्यान, विद्यापीठाच्या इशाऱ्याला न जुमानता आपले आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय एमफुक्टो आणि बुक्टूने घेतला आहे. प्राचार्याकडून नोटिसा येत असतील तरी शिक्षकांनी त्याकडे दुर्लक्ष करा, असे आवाहन बुक्टूच्या डॉ. मधू परांजपे यांनी केले. एमफुक्टोच्या वतीने ८ मार्चला आझाद मैदानात जमून जेलभरो आंदोलन केले जाणार आहे. या वेळी सरकारच्या आदेशाची होळी करून प्राध्यापक आपला निषेध व्यक्त करतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा