विलेपार्ले येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे मैत्रीणीसोबत नग्नावस्थेत चित्रीकरण करून त्याच्याकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने एका आरोपीला अटक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>Video: “विनयभंगाची व्याख्या काय, हे एकदा गृहमंत्री…”, सुषमा अंधारेंचं टीकास्र; म्हणाल्या, “अटकेसाठी तयार!”

विलेपार्ले येथे वास्तव्यास असलेला तक्रारदार युवक महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिक्षण घेत आहे. या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीची आठ महिन्यांपूर्वी त्याच्याशी ओळख झाली होती. तर दुसरा आरोपी दोन वर्षांपूर्वी तक्रारदाराच्या संपर्कात आला होता. दोन आठवड्यापूर्वी अटक आरोपी तक्रारदाराला अंधेरी येथील बॅक रोड परिरात भेटला. त्यावेळी त्याने तक्रारदाराला मोबाइलमधील एक चित्रफीत दाखवली. त्यात तक्रारदार व त्याची मैत्रीण नग्नावस्थेत होती. एका हॉटेलमध्ये तक्रारदाराचे चित्रीकरण करण्यात आले होते. त्यामुळे घाबरलेला तक्रारदार रडू लागला. त्याने आरोपीला मोबाइलमधील चित्रीकरण काढून टाकण्यास सांगितले. पण त्याने त्याला नकार दिला. उलट तक्रारदाराकडेच पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. रक्कम न दिल्यास समाज माध्यमांवर चित्रीकरण प्रसारित करण्याची धमकी त्याने दिली.

हेही वाचा >>>मुंबई: घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपींना अटक

दुसरा आरोपी मोबाइल चार्ज करण्याच्या निमित्ताने तक्रारदाराच्या खोलीत आला होता. त्यावेळी त्याने मोबाइलमध्ये ॲप डाऊनलोड करून तक्रारदाराचे चित्रीकरण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या संपूर्ण प्रकारामुळे घाबरलेल्या तक्रारदाराने सुरूवातीला अडीच लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली होती. पण आरोपीने धमकावल्यामुळे पाच लाख रुपये देण्यास तो तयार झाला. यावेळी अटक आरोपीने तक्रारदाराला पोलिसांत तक्रार केल्यास ठार मारण्याची धमकीही दिली. त्यामुळे तक्रारदार तणावाखाली होता. आरोपी वारंवार व्हॉट्सॲपवरून संपर्क साधून तक्रारदाराकडे पाच लाख रुपयांची मागणी करीत होता. त्यामुळे घाबरलेल्या तक्रारदाराने याप्रकरणी गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार केली. या तक्रारीवरून ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेच्या पथकाने याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: College student filmed with girlfriend and demanded ransom in vileparel mumbai print news amy