क्लासचालकांशी संगनमत करून आपल्या आवारातच ‘समांतर व्यवस्था’ निर्माण करणाऱ्या ‘दुकानदारी’ वृत्तीमुळे कनिष्ठ महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण गढूळ होऊ लागले असून शिक्षकांमध्येही अनास्था आणि निरूत्साह पसरू लागला आहे.
‘टायअप’चा वरदहस्त लाभलेला आणि नसलेला असे दोन गट महाविद्यालयांमध्ये निर्माण होऊ लागले आहेत. वरदहस्त असलेल्यांना हजेरी किंवा तत्सम बंधनांपासून मुक्ती. तर इतरांना मात्र ७५ टक्के हजेरीची सक्ती. केवळ पैशाच्या जोरावर चाललेला हा भेदभाव वर्गात शिकविणाऱ्या शिक्षकांनाही बघवत नाही. म्हणून ते ‘वरदहस्त’ असलेल्या व नसलेल्याही विद्यार्थ्यांची गैरहजेरी फारशी मनावर घेईनासे झाले आहेत. अशीही ऑक्टोबर उजाडेपर्यंत विद्यार्थ्यांची वर्गातली उपस्थिती चांगलीच रोडावलेली असते. त्यामुळे, विषयाच्या तयारीने वर्गात यायचे ते कुणासाठी? आपले काम केवळ प्रात्यक्षिक परीक्षांपुरते, अशी भावना आता शिक्षकांमध्ये मूळ धरू लागली आहे. शिक्षकांमधील हा निरुत्साह येत्या काळात कनिष्ठ महाविद्यालय व्यवस्थेच्याच मुळावर येणार आहे. परिणामी भविष्यात अमुक एका महाविद्यालयातील अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये दिसून येणारी चढाओढ ही केवळ ऐतिहासिक घटना म्हणूनच ओळखली जाईल.
मुलांना आपल्या जाळ्यात अडकविण्याचा फंडाही मोठा अजब असतो. प्रवेश घेतेवेळेस विद्यार्थी-पालक जातात तेव्हा महाविद्यालयाच्या आवारातच क्लासचालकांची दुकाने एखादे टेबल टाकून सुरू असतात. प्रवेश प्रक्रियेमुळे एव्हाना हेलपाटलेला पालक जेव्हा या टेबलांभोवती घुटमळतो तेव्हा किती मार्क, मेडिकल की इंजिनिअरींग, अशी विचारणा टेबलापलीकडून सुरू होते. ९० टक्के? थोडे कमीच आहेत, एकदोन टक्के आणखी हवे होते, अशी शेरेबाजी ऐकल्यानंतर तर तो पालक आणखीच गळून जातो. मग, आमच्याकडे प्रवेश घेतला तर हजेरी लावायला नको, फक्त प्रॅक्टिकलपुरते वर्गात गेलात तरी पुरे. अभ्यास करायला जास्त वेळ मिळतो, असे गाजर दाखविल्यानंतर तर पालक या जाळ्यात चांगलाच फसतो.
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे महाविद्यालयांची ही दुकानदारी सध्या तरी नवीन असल्याने त्यात असलेले तोटे आणि नुकसान ग्राहक असलेल्या पालकांच्या अद्याप लक्षात आलेले नाहीत. कारण, या दुकानदारीतून ते जो ‘माल’ पदरात पाडून घेत आहेत तो बाहेरच्या दुकानांपेक्षा कितीतरी चढय़ा भावात स्वीकारत आहेत. महाविद्यालये आणि क्लासेसच्या टायअपमधून मोजावे लागणारे शुल्क बाहेर चालणाऱ्या त्याच क्लासच्या शुल्करचनेपेक्षा कितीतरी अधिक आहे. महाविद्यालये प्रत्येक विद्यार्थ्यांमागे आपले कमिशन आणि वर्गाचे भाडे घेत असल्याने टायअपमध्ये क्लासेस शुल्क वाढवून सांगतात. वास्तविक टायअप करणाऱ्या महाविद्यालयांतून क्लासची शुल्काची रक्कम कमी असायला हवी. कारण, हे टायअप ते आपल्या मुलांच्या ‘सोयीसाठी’ करत असतात. पण, घडते भलतेच.

Story img Loader