पुण्यानंतर शिक्षणाची पंढरी म्हणून उदयास आलेल्या नवी मुंबईतील शैक्षणिक संस्थांची महाविद्यालये, तांत्रिक महाविद्यालये आणि नामांकित शाळांना आता दलालांचा गराडा पडू लागला असून, यात राजकीय पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते आघाडीवर असल्याची बाब उघडकीस आली आहे.
नवी मुंबईत सिडकोने शैक्षणिक संस्थांना प्रथम प्राधान्य दिल्याने शहरात शैक्षणिक संस्थांचे जाळे तयार झाले आहे. त्यामुळे शाळा, कॉलेज, तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षणाच्या अनेक संधी येथे प्राप्त झालेल्या आहेत.
पाच हजार विद्यार्थ्यांसाठी एक प्राथमिक विद्यालय, तर १२ हजार ५०० विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय आणि ५० हजार विद्यार्थ्यांसाठी तंत्रशिक्षण महाविद्यालय असे समीकरण सिडकोने हे भूखंड देताना सांभाळले होते. त्यामुळे शहरात २२८ प्राथमिक, १४१ माध्यमिक आणि ६२ विद्यालये, १८ इंजिनीअरिंग, पाच वैद्यकीय अशी कॉलेजची संख्या उभी राहिली आहे.
आता सीबीएसई, आयसीएससी शाळांची संख्याही वाढू लागली आहे. त्यामुळे नवी मुंबईतील शाळा कॉलेजना पालक पसंती देऊ लागले. याचा फायदा शैक्षणिक दलालांनी उचलण्यास सुरुवात केली आहे.
सध्या इंजिनीअरिंगमधील मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स आणि त्यानंतर कॉम्प्युटर शाखांना मोठी मागणी आहे. यात इलेक्ट्रिकल आणि आयटी या शाखांची परिस्थिती खराब असल्याने त्याकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे या शाखांच्या व्यवस्थापन कोटय़ातील प्रवेशासाठी अहमहमिका सुरू आहेत. मेकॅनिकल आणि सिव्हिल शाखांना सध्या १० लाख रुपये प्रति प्रवेश दर लागू झालेले असून, इलेक्ट्रॉनिक्स सहा ते आठ व कॉम्प्युटर अभ्यासक्रमासाठी दोन ते तीन लाखांत प्रवेश मिळत आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी २५ ते ४५ लाख रुपये प्रति सीट दर लावला गेला असून, यात दलालांचा सुळसुळाट झाला आहे. हे दलाल प्रति सीट दोन ते तीन लाख रुपये कमवीत आहेत.

Story img Loader