अनेक महाविद्यालयांकडून अभ्यासक्रम शिकवण्यास सुरुवात; यंदा सुट्टय़ांना कात्री लावून जादा वर्ग

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तांत्रिक घोळामुळे जवळपास आठवडाभर लांबलेल्या अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेचे परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होणार आहे. मात्र, ज्या महाविद्यालयांची ९० ते ९५ टक्के प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली आहे त्यांनी वेळेआधीच (९ ऑगस्ट) म्हणजे २५ जुलैपासून अकरावीचे वर्ग सुरूही केले आहेत, तर उर्वरित महाविद्यालयांना पहिल्या सत्राचा भरमसाट अभ्यासक्रम उरकण्यासाठी गणपती आणि दिवाळीच्या सुट्टय़ांमध्ये वर्ग चालवण्याची वेळ येणार आहे.

दरवर्षी रडतखडत चालणारी अकरावीची प्रवेशप्रक्रिया यंदाही लांबलेली आहे. त्यामुळे महाविद्यालये सुरू होण्यास ९ ऑगस्ट उजाडणार आहे. त्यातच यंदाचा सहामाहीचा कालावधीही मागील वर्षांपेक्षा कमी असल्याने अकरावीचा अभ्यासक्रम इतक्या कमी कालावधीमध्ये कसा उरकायचा, असा प्रश्न महाविद्यालयांना पडलेला आहे. त्यामुळे पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये ९५ टक्के प्रवेश पूर्ण झालेल्या नामांकित महाविद्यालयांनी १५ दिवस आधीच महाविद्यालये सुरू केली आहेत. महिनाभरानंतर नियोजित असलेल्या पहिल्या सत्राच्या परीक्षेआधी प्रत्येक विषयाचा किमान अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी या महाविद्यालयाची गडबड सुरू झाली आहे. तसेच सहामाही परीक्षेआधी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी गणपती आणि दिवाळीच्या सुट्टय़ांमध्येही या महाविद्यालयांना वर्ग भरवावे लागणार आहेत. ‘ऑनलाइन प्रवेशपद्धती राबविल्यापासून दरवेळेसच प्रवेशप्रक्रिया उशिराच होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करणे खरेतर अडचणीचे होते. साधारण १ सप्टेंबरच्या आसपास पहिल्या सत्राची परीक्षा असणार आहे. तेव्हा या आधी या परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठीच लवकरच म्हणजे २९ जुलैपासूनच महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. उशिरा प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा अधिक तासिका घेऊन अभ्यासक्रम पूर्ण केला जातो. त्यामुळे यांची पहिल्या सत्राची परीक्षा चुकली तरी त्यांच्यासाठी पुनर्परीक्षेचे आयोजन केले जाते. परंतु कमी कालावधीमध्ये जास्त अभ्यासक्रम शिकताना मुलांनाही त्रास होत असतो,’ असे रुईया कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या नीलम राणे यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.

‘ऑगस्टमध्ये महाविद्यालये सुरू झाली की ऑक्टोबरमध्येच त्यांचे पहिले सत्र संपते. त्यामुळे फक्त तीन महिन्यांमध्ये अभ्यासक्रम उरकावा लागतो. त्यामुळे आम्ही दिवाळीच्या सुट्टय़ानंतरच पहिली सहामाही परीक्षा घेतो. उर्वरित अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी दिवाळीच्या सुट्टय़ांचा कालावधी मिळतो. लांबलेल्या प्रवेशप्रक्रियेचे गणित लक्षात घेऊनच आम्ही १ ऑगस्टपासूनच महाविद्यालय सुरू करणार आहोत,’ असे के. जे. सोमय्या कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य नरेंद्र पाठक यांनी सांगितले.

अकरावीच्या परीक्षा या महाविद्यालयीन पातळीवर घेण्यात येतात. त्यामुळे त्यांच्या अभ्यासाच्या वेळापत्रकानुसार परीक्षा घेण्याचा अधिकार त्यांना असतो. तेव्हा प्रवेशप्रक्रियेला उशीर जरी झाला असला तरी दिवाळी आणि गणपतीच्या सुट्टय़ांच्या कालावधीमध्ये जादा वर्ग घेऊन महाविद्यालयांनी अभ्यासक्रम पूर्ण करावा आणि त्यानुसार अकरावीच्या परीक्षा घेण्यात याव्यात.

बी. बी. चव्हाण, शिक्षण उपसंचालक

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Colleges started fyjc class before admission work complete