संलग्नता मिळविण्यासाठीच्या प्रक्रियेकरिता महाविद्यालयांनी मुंबई विद्यापीठाकडे कोटय़वधी रुपये शुल्कापोटी जमा करूनही गेल्या चार वर्षांत एकाही अभियांत्रिकी व औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रम चालविणाऱ्या महाविद्यालयाला संलग्नता देण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
या चुकारपणा व दफ्तर दिरंगाईला विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळुकर यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी ‘मुंबई युनिव्‍‌र्हसिटी अ‍ॅण्ड कॉलेज टिचर्स असोसिएशन’ (मुक्ता) या संघटनेने केली आहे.  संलग्नता नसलेल्या महाविद्यालयांना कॅम्पमध्ये (केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया) सहभागी होता येत नाही. ‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे’ने (एआयसीटीई) ठरवून दिलेल्या निकषांची पूर्तता केल्याने मुंबईतील फारच थोडय़ा महाविद्यालयांकडे कायम संलग्नता आहे. पण, ही महाविद्यालये प्रवेशांपासून वंचित राहू नये म्हणून प्रत्येक महाविद्यालयाला त्या त्या शैक्षणिक वर्षांपुरती तात्पुरती संलग्नता दिली जाते.

संलग्नता मिळवण्याची प्रक्रिया
प्रत्येक महाविद्यालयाला अर्ज करावा लागतो
त्यासोबत साधारणत ७५ हजार रुपये शुल्क भरावे लागते
विद्यापीठाकडून चौकशी समिती महाविद्यालयात जाते
अर्जदार महाविद्यालयातील शैक्षणिक व भौतिक सुविधांची तपासणी होते
समिती अहवाल विद्यापीठाला सादर करते
त्यानंतर संलग्नता मिळते

कुलगुरूंवर कारवाई हवी
संलग्नता नसताना या महाविद्यालयात प्रवेश झालेच कसे, तेथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची नावनोंदणी झालीच कशी, त्याचे परीक्षांचे अर्ज स्वीकारले कसे, असे सवाल मुक्ताने केले आहे. उच्च न्यायालयाने स्थानिक विद्यापीठाची मान्यता नसताना तंत्रशिक्षण संचालनालयाने ‘नागाव एज्युकेशन संस्थे’च्या महाविद्यालयाचा समावेश कॅपमध्ये केल्याने राज्य सरकार व विद्यापीठाला दंड ठोठावला आहे. तसेच, या करिता तंत्रशिक्षण संचालकांच्या पगारातून एक रुपया कापण्याचे आदेश दिले आहेत. या पाश्र्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंवरही चुकारपणाबद्दल कारवाई व्हायला हवी, अशी मागणी मुक्ताने केली आहे.

विनासंलग्नता महाविद्यालयांचे प्रवेश
मुंबई विद्यापीठात एकूण १००हून अधिक अभियांत्रिकी व औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालये येतात. कायम संलग्नता असलेली तुरळक महाविद्यालये वगळता उर्वरित एकाही महाविद्यालयाला विद्यापीठाने गेल्या चार वर्षांत तात्पुरती संलग्नता दिलेली नाही. संलग्नता मिळविण्यासाठीच्या प्रक्रियेसाठी प्रत्येक महाविद्यालय प्रत्येक अभ्यासक्रमाकरिता ७५ हजार रुपये विद्यापीठाकडे जमा करते. या शुल्कापोटी विद्यापीठाकडे कोटय़वधी रुपये जमा झाले आहेत. विनासंलग्नतेशिवाय ही सर्व महाविद्यालये प्रवेश करीत आली आहेत.

Story img Loader