कपडे धुण्याइतपतही पाणी स्वच्छ नसल्याची तक्रार; पिण्यासाठी बाटलीबंद पाण्याच्या खरेदीचा भरुदड

गेल्या ४५ वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या चेंबूर पश्चिमेकडील छेडा नगर येथील वसाहतींना सध्या दूषित पाण्याने ग्रासले आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून छेडानगरमधील वसाहतींना दूषित व दरुगधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असून पालिकेकडे वारंवार तक्रार करूनही त्यात सुधारणा झालेली नाही. हे पाणी पिण्यासाठी अपायकारक आहेच; परंतु, ते कपडे धुणे किंवा भांडी घासण्यासाठीही वापरता येण्यासारखे नाही, अशा येथील रहिवाशांच्या तक्रारी आहेत. त्यातच पिण्यासाठी म्हणून येथील प्रत्येक कुटुंबाला दिवसाला २० ते ३५ लिटर बाटलीबंद पाणी खरेदी करावे लागत असल्याने रहिवाशांना आर्थिक भरुदडही बसू लागला आहे.

चेंबूर पश्चिमेकडील छेडा नगरमध्ये ११० इमारती असून त्यामध्ये काही खासगी गृहनिर्माण संस्थाही आहेत; परंतु या भागात जानेवारी महिन्यापासून दूषित पाणीपुरवठय़ाची समस्या भेडसावते आहे. येथील ४५-५० वर्षे जुन्या आणि खराब झालेल्या जलवाहिन्यांमध्ये सांडपाणी मिसळत असल्याने ही समस्या उद्भवते आहे. याबाबत पालिकेकडे वारंवार तक्रार करून आणि सातत्याने बठका घेऊनही या समस्येतून येथील रहिवाशांची सुटका झालेली नाही. नीलगिरी, उदयगिरी, विनय-विवेक, मीरा-मधुरा, कांचन-शीतल, श्रीराम, रंगप्रभा, मांडोवी आदी गृहनिर्माण संस्थांना या दूषित पाणीपुरवठय़ाच्या प्रश्नाला तोंड द्यावे लागत आहे.

पालिकेतर्फे रहिवाशांना पुरवले जाणारे पाणी इतके गढूळ व दरुगधीयुक्त असते की, ते अन्य कामांसाठीही वापरता येत नाही, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. अनेक इमारतींमधील रहिवासी आता पिण्याखेरीज अन्य कामांसाठीही बाटलीबंद पाणी खरेदी करू लागले आहेत. नीलगिरी इमारतीत राहणारे ६४ वर्षीय हसमुख ठक्कर यांनी आपण दिवसाला ३५ लिटर बाटलीबंद पाणी खरेदी करत असल्याचे सांगितले. यासाठी दररोज सुमारे २७० रुपये खर्च त्यांना सोसावा लागत आहे. ‘आर्थिक खर्च एकवेळ परवडला. परंतु, गेल्या महिन्यात दूषित पाण्यामुळे मला मूत्रनलिकेतील संसर्गामुळे आजार उद्भवला. तेव्हापासून आम्ही सर्व कामांसाठी बाटलीबंद पाणी वापरतो,’ असे ठक्कर यांनी सांगितले. ‘मीरा-मधुरा’ संकुलात राहणाऱ्या एका वृद्ध दाम्पत्याला महिन्याच्या खर्चातील तीन हजार रुपये बाटलीबंद पाण्याच्या खरेदीसाठी बाजूला ठेवावे लागत असल्याचे या दाम्पत्याने सांगितले.

दूषित पाण्याच्या वापरामुळे तसेच सेवनामुळे या परिसरात आरोग्याच्या तक्रारीही प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. ‘आमच्याकडे पोटदुखी, उलटय़ा, जुलाब अशा तक्रारी घेऊन दिवसाला ३ ते ४ रुग्ण येतात,’ अशी माहिती स्थानिक डॉक्टर विक्रम शेखट यांनी सांगितले.

खर्च करायचा कुणी?

‘खराब जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी येणाऱ्या खर्चातील दोनतृतीयांश रक्कम पालिका देण्यास तकार आहे. उर्वरित खर्च स्थानिक आमदारांच्या निधीतून करावा, असे पालिकेचे म्हणणे आहे. परंतु,  आमदारांनी हा खर्च देण्यास नकार दिला,’ असे छेडानगर वेल्फेअर असोसिएशनचे सचिव विद्याधर दळवी यांनी सांगितले. स्थानिक आमदार प्रकाश फातर्पेकर यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता, ते म्हणाले, ‘खासगी गृहसंस्थांच्या समस्यांसाठी पूर्ण खर्च पालिका करणे नियमात बसत नसले तरी मूलभूत गरजेसाठी पालिकेने पूर्ण खर्च करणे अपेक्षित आहे. आणि तसा प्रस्ताव मी स्थायी समितीमध्ये मांडला आहे.’

Story img Loader