चित्रात किंवा दृश्यकलेत स्त्रीचं दृक्-प्रतिनिधित्व (व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन) कसं करावं, याबाबत महिला चित्रकार निराळा विचार करू शकतात, हे ‘लोकसत्ता’च्या- विशेषत: नूपुर देसाई लिहीत असलेल्या ‘रंगधानी’ या सदराच्या- वाचकांना वेगळं सांगायला नको. रंगचित्रामध्ये स्त्रीचा आकार काढण्याचे निरनिराळे प्रयोगही स्त्री-चित्रकारांनी केलेले आहेत. नलिनी मलानी यांनी केवळ रंगांच्या पुंजक्यांनी स्त्रीदेह साकार करण्याची पद्धत रुळवली, शकुंतला कुलकर्णी यांनी (त्या जेव्हा रंगचित्रंच करत तेव्हा) ठसठशीत बाह्य़रेषांच्या आधारे स्त्रीचं अस्तित्व ठसवलं, दिल्लीच्या गोगी सरोज पाल यांनी स्त्रीदेहाऐवजी, स्त्रीचा चेहरा असलेल्या पक्षिणीचं शरीर चित्रांत आणलं. या साऱ्या ज्येष्ठ चित्रकर्ती. इतिहासातही नोंद झालेल्या. पण ‘जहांगीर आर्ट गॅलरी’त अधूनमधून असे प्रयत्न दिसत राहतात. एरवी चिकटचित्रं (कोलाज) या प्रकारात रमणाऱ्या शुभा गोखले यांनी गेल्याच महिन्यात कोळी समाजातील महिलांची चित्रं या सार्वजनिक दालनात मांडली, तेव्हा त्याही चित्रांमध्ये आकाराच्या सौष्ठवापेक्षा कष्टांकडे लक्ष वेधलं जात होतं. मुंबईत पहिलंच एकल प्रदर्शन भरवणाऱ्या स्वाती साबळे या आदल्या पिढीच्या मानानं नव्या. पण त्यांच्याही चित्रांमध्ये स्त्रीदेहचित्रणाला पर्याय शोधण्याची आस दिसते आहे.
‘चौकट’ आणि ‘ओघळ’ ही दृश्य-वैशिष्टय़ स्वाती साबळे यांच्या बहुतेक चित्रांमध्ये आहेत. हे दोन्ही शब्द स्त्रीजीवनाच्या संदर्भात वापरले जातात, तेव्हा त्यांना निराळा अर्थ प्राप्त होतो. या प्रदर्शनाला प्रस्तावना लिहिणाऱ्या ज्येष्ठ कलाभ्यासक डॉ. मनीषा पाटील यांनी या वैशिष्टय़ांचं समर्पक विश्लेषण केलं आहे. ‘बीइंग हर..’ नावाच्या या प्रदर्शनातली चित्रं पाहताना जाणवेल ते असं की, इथल्या चित्रांतल्या स्त्रीदेहांना आकार असले काय नि नसले काय, ‘तिच्या’ अस्तित्वाचा, मन:स्थितींचा विचार प्रेक्षकांपुढे मांडण्यासाठी आवश्यक बाबी तेवढय़ा चित्रात असल्या तरी पुरेसं आहे – असं चित्रकर्ती आपल्याला सांगते आहे. या स्त्रियांना चेहरे आहेत, त्या चेहऱ्यांतून संयतपणे भावदर्शनही होत आहे. हातांची घडी, बसण्याची पद्धत, आसपासच्या रंगछटा यांतून चित्रातल्या ‘ती’चं म्हणणं प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकत आहे. हे करताना रंगलेपनाच्या ज्या पद्धतींचा आधार घेतला गेला आहे, त्या फार लोकोत्तर आहेत असं नाही. कला महाविद्यालयांतही त्या ‘क्रिएटिव्ह पेंटिंग’ या विषयात वापरल्या जातात. पण त्या सर्व पद्धतींचं उपयोजन इथं विषय मांडण्यासाठी चपखलपणे केलेलं दिसेल.
‘जहांगीर’मधले अन्य..
जहांगीर आर्ट गॅलरीच्या एकमेकांस जोडलेल्या तीन दालनांपैकी दुसऱ्या दालनात अंकित पटेल आणि तिसऱ्यात रामेश्वर शर्मा यांच्या कलाकृती आहेत. यांपैकी अंकित पटेल हे शिल्पकार. त्यांची मोठमोठी आणि स्वत:च्या आसाभोवती फिरू शकणारी केवलाकारी शिल्पं मध्यंतरी देशात गाजली होती. पण ताज्या प्रदर्शनात पटेल पुन्हा मानवी हालचालींचं निरीक्षण या विषयवस्तूवर स्थिरावलेले दिसतात. आधुनिक शिल्पकलेत गेल्या १०० वर्षांत मानवाकृतीचं जितकं अमूर्तीकरण झालं, तितपतच इथेही आहे. पण भारतीय समाजातल्या काही हालचाली टिपून (उदाहरणार्थ, पतंग पकडण्यासाठी रस्त्यावरल्या विजेच्या खांबावर चढणं) या शिल्पांत पटेल यांनी नावीन्य आणण्याचा प्रयत्न केला आहे. सहा मोठय़ा युगुलशिल्पांचे फोटो तितक्याच मोठय़ा फ्लेक्सवर लावून, ते फ्लेक्सच एका भिंतीवर या प्रदर्शनात मांडण्याची कल्पनाही लक्षवेधी आहे. प्रदर्शन मात्र लहान शिल्पांनीच भरून गेलेलं आहे. तिसऱ्या दालनातले रामेश्वर शर्मा हेही साधारण पटेल यांच्याचइतके अनुभवी असून, त्यांची चित्रं ही प्राचीन शिल्पं, लघुचित्रांवर मुघल प्रभाव पडण्याआधीची भारतीय (जैन, कलमकारी, चित्रकथी आदी) चित्रं, जुन्या पोथ्या, यांच्या दृश्यसंस्कारांतून आजची स्वप्नं, आजच्या कथा मांडणारी आहेत. मात्र या चित्रांमधला वर्णनात्मक भाग प्रेक्षकांपर्यंत फारच कमी वेळा पोहोचतो, हा रामेश्वर यांच्या चित्रांवरला किमान २० वर्षांपासूनचा आक्षेप या प्रदर्शनातही खराच ठरेल. हिरवा, लाल, पिवळा, कधीकधीच निळा अशा ठसठशीत रंगांची सवय सोडून रामेश्वर यांनी गेल्या सहा-सात वर्षांत बरीच कृष्णधवल (आणि आकारानं थोडी लहान) चित्रं केली; तीही इथं आहेत. ‘जहांगीर’च्या वरच्या मजल्यावरील ‘हिरजी जहांगीर’ दालनात संतोष पेडणेकर यांची निसर्गचित्रं, स्थिरचित्रं आणि व्यक्तिचित्रणावर भर देणारी चित्रं पाहायला मिळतात. तंत्रावर हुकूमत मिळवत चित्रातला निरागसपणा जपण्याचं कसब पेडणेकर यांनी जपलं आहे. याच ‘जहांगीर’च्या दुसऱ्या जिन्यानं वर गेलात, तर गच्ची ओलांडून पलीकडल्या खास छायाचित्र-दालनात फोटोग्राफीतला ‘क्षण’ कसा आणि का महत्त्वाचा असतो, हे टिपणारी काही छायाचित्रं पाहायला मिळतील! अनिल पुरोहित यांनी टिपलेली ही छायाचित्रं आहेत. फोटोग्राफीचं प्रदर्शन पुढील मंगळवारी- १९ डिसेंबर रोजी संपेल, तर ‘जहांगीर’मधली अन्य सर्व प्रदर्शनं पुढील सोमवापर्यंत (१८ डिसेंबर) सुरू राहतील.
प्रकाशयोजनेतून वाढलेलं गूढ..
जहांगीरच्याच सभागृह दालनात विवीक शर्मा (यांचं पूर्वीचं नाव ‘विवेक’च होतं. आता विवीक) यांच्या अगदी मोजक्याच पण आकारानं मोठय़ा चित्रांचं प्रदर्शन भरलं आहे. कुंभमेळ्याच्या किंवा अन्यत्र दिसणारे साधू, घाटावर डुबकी मारणारे भाविक, लेणं आणि त्याच्या भग्नतेतूनही जाणवणारा धीरगंभीरपणा, अशा चित्रविषयांमधून धर्माबद्दलचं गूढ वलय अधोरेखित करण्याचा शर्मा यांचा प्रयत्न; प्रत्येक चित्रावर नाटकातल्या प्रकाशयोजनेसारखा ‘फूटलाइट’चा झोत असल्यामुळे आणखीच यशस्वी झालेला दिसतो.