दिल्लीतील बलात्कार प्रकरणामुळे यंदा नववर्ष स्वागताच्या जल्लोषाचा पेला काठोकाठ भरलाच नाही. ३१ डिसेंबरची रात्र मुंबई-ठाणेकरांनी जागविली खरी, पण त्यात नेहमीचा जल्लोषी उत्साह नव्हता. एक प्रकारचे उदासवाणेपण त्यात पाहावयास मिळत होते. त्यास काही प्रमाणात कारणीभूत ठरली ती १ तारखेला पहाटे चार वाजता सुरू झालेली अंगारकी चतुर्थी. तब्बल ९५ वर्षांनी प्रथमच आलेल्या या योगामुळे अनेकांनी पाटर्य़ा आटोपत्या घेतल्या, तर असंख्य भाविकांनी सिद्धीविनायक मंदिर, टिटवाळ्यातील गणेशमंदिर येथे रात्रीपासूनच रांगा लावून नव्या वर्षांचा श्रीगणेशा केला. महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन यंदा पोलिसांनी सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. मद्य प्राशन करून वाहने चालविणारांविरोधातही पोलिसांनी मोठी मोहिम राबविली. दरम्यान, नव्या वर्षांचा आनंद साजरा करण्यासाठी बाहेर पडलेल्या एका मुलाचा आरे कॉलनी येथे अपघाती मृत्यू झाला.
अल्पवयीन मुलाचा अपघातात मृत्यू
नवीन वर्षांच्या स्वागतासाठी मैत्रिणीसह बाहेर पडलेल्या एका अल्पवयीन मुलाचा मोटारसायकल अपघातात मृत्यू झाला. सोमवारी मध्यरात्री आरे कॉलनीच्या युनिट १६ परिसरात ही घटना घडली. या अपघातात त्याची मैत्रीण जखमी झाली आहे.
अंधेरीच्या मरोळ येथे राहणारा अक्षय साळुंखे (१७) हा युवक आपली १५ वर्षीय मैत्रीण सारिका जुवेकर (नाव बदलले) हिच्याबरोबर नवीन वर्षांच्या स्वागतानिमित्त निघाला होता. रात्री साडेबाराच्या सुमारास तो अंधेरीहून गोरेगावच्या दिशेने येत होता. आरे कॉलनीच्या दिनकर देसाई रोडवरील युनिट १६ च्या पालिका रुग्णालयासमोर असताना भरधाव वेगाने त्याची मोटारसायकल जवळच्या सिमेंटच्या कंपाऊडच्या िभतीवर धडकली. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तर सारिकाला किरकोळ जखमा झाल्या. अक्षयला उपचारासाठी भगवती रुग्णालयात नेण्यात आले. परंतु तेथे त्याचा मृत्यू झाल्याचे आरे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले.
मुंबईत ८४०, तर नवी मुंबईत १७५ तळीरामांवर कारवाई
३१ डिसेंबरच्या रात्री मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या ८४० मद्यपी चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यापैकी २८० जण विनापरवाना वाहन चालवणारे होते. गेल्या १० दिवसांपासून मद्यपी वाहनचालकांविरोधात मुंबई वाहतूक पोलिसांनी मोहीम उघडली होती.
याबाबत माहिती देताना अतिरिक्त पोलीस आयुक्त ब्रिजेश सिंग (वाहतूक) यांनी सांगितले की, डिसेंबर महिन्यात मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या २९२३ वाहन चालकांविरोधात कारवाई करण्यात आली. त्यापैकी २७७६ मागील १० दिवसांत सापडले आहेत. मद्यपान करून वाहन चालविण्याच्या सर्वात जास्त घटना पूर्व उपनगरात घडल्या आहेत. तेथे तब्बल २७७ गुन्हे दाखल झाले आहेत, तर पश्चिम उपनगरात (१८३), उत्तर मुंबईत (१६८) आणि दक्षिण मुंबईत (९६) गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. याशिवाय वाहनांवर काळ्या काचा लावणाऱ्या ८४८ वाहनांवरही एकाच दिवसात कारवाई करण्यात आली आहे. २०१२ या वर्षांत मद्यपान करून वाहन चालविणारे सर्वाधिक चालक चारचाकी वाहनांचे होते. पोलिसांनी या संदर्भात पकडलेली ३७१७ वाहने चारचाकी होती. त्याखाली १५२७ मोटारसायकली तर ३४४ तीन चाकी वाहने होती. इतर वाहनांमध्ये २८३ टेम्पो, १७५ ट्रक्स, ३८ बसेस आणि ५६ डम्परचा समावेश आहे. दररोज मुंबईत सरासरी २० वाहने मद्यपी वाहक चालवत असल्याचे आढळून येत आहे. नाकाबंदीच्या ठिकाणी पोलिसांनी भरधाव वेगाने वाहन चालविणाऱ्यांचे व्हिडीओ चित्रीकरणही केले आहे. त्यांना शोधून नंतर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, नवी मुंबईत रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी केलेल्या कारवाईत १७५ तळीरामांची धरपकड केली. नाताळ ते ३१ डिसेंबर या सहा दिवसांत केलेल्या विशेष कारवाईत ४७३ तळीरामांना पोलीस कोठडीची हवा खावी लागली.
मोटारसायकलस्वारांच्या टोळीला अटक
भरधाव वेगाने मोटारसायकल चालवून नाकाबंदीच्या पोलिसाला धडक दिल्याप्रकरणी १० मोटारसायकलस्वारांना पोलिसांनी अटक केली. मरिन ड्राइव्ह येथील तारापोरवाला मत्स्यालयासमोर मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली मंगळवारी पहाटे मोटारसायकल चालवणाऱ्या तरुणांचा गट भरधाव वेगाने जात होता. मोटारसायकलीवर मस्ती करत हा गट भरधाव वेगाने चालला होता. तारापोरवाला मत्स्यालयासमोर पोलिसांनी नाकाबंदी लावली होती. मात्र या तरुणांनी नाकाबंदी न जुमानता पोलिसांनी लावलेले बॅरिकेडसही उडवले. बंदोबस्तासाठी असलेले पोलीस निरीक्षक पवार त्यांच्या धडकेत जखमी झाले. इतर पोलिसांनी या सर्व १० जणांना अटक केली. हे सर्व तरुण भांडुप, मुंब्रा येथे राहणारे आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा