अॅड. गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याचे धागेदोरे सापडलेले नसले तरी पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले. पानसरे यांच्यावर कोल्हापूरमध्ये झालेल्या हल्ल्याला तीन दिवस उलटले असले तरी हल्लेखोरांचा मागमूसही पोलिसांना लागू शकलेला नाही.
अॅड. पानसरे यांच्या पत्नीच्या तब्येतीत सुधारणा होत असून त्या आता बोलू शकतात. त्यामुळे त्यांच्या मदतीने हल्लेखोरांची रेखाचित्रे तयार करण्यात येत आहेत. ही रेखाचित्रे तयार झाल्यावर तपासाला मदत होईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्यावरील हल्ल्याप्रमाणेच हा हल्ला झाला असला तरी त्यांचा परस्परांशी काही संबंध आहे का, हे सांगता येणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पानसरे यांच्या हल्ल्याची सीबीआयकडून चौकशी करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात बुधवारी सादर करण्यात आली आहे. दाभोलकर यांच्यावरील हल्ल्यासारखाच हा हल्ला असल्याचा दावा करीत केतन तिरोडकर यांनी ही याचिका सादर केली असून त्यावर न्यायमूर्ती पी. व्ही. हरदास आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठापुढे ४ मार्चला सुनावणी ठेवण्यात आली आहे.
उमा पानसरेंच्या जबाबाकडे लक्ष
पानसरे दाम्पत्यावरील हल्ल्याच्या तपासाबाबत महत्त्वाचा ठरणारा उमा पानसरे यांचा जबाब घेणे अद्याप बाकी आहे. त्यांच्या जबाबानंतर हल्लेखोरांबाबत काही तपशील मिळतील असे कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांनी सांगितले.