राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पुन्हा मंत्रिमंडळात पुनरागमन होणार असेल तर ती महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक असून आम्ही ती कोणत्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांच्या स्वच्छतेचा बुरखा फाडून सिंचन घोटाळ्याला जबाबदार असणाऱ्या अजित पवार यांना त्राही भगवान करून सोडू, असा इशारा शिवसेना-भाजप- मनसे नेत्यांनी दिला आहे.
राज्य मंत्रिमंडळातील पाच भ्रष्ट मंत्र्यांनी हजारो कोटींचे घोटाळे करून ठेवले आहेत. सिंचन घोटाळ्याप्रकरणी श्वेतपत्रिका येऊन निर्दोष सुटेपर्यंत आपण मंत्रिमंडळात येणार नाही, अशी घोषणा अजित पवार यांनी राजीनामा देताना केली होती. प्रत्यक्षात श्वेतपत्रिकेत घोटाळ्याबाबत व चौकशीविषयी एक शब्दही नाही. ७० हजार कोटी रुपये खर्चून धरणेच बेपत्ता करण्याची जादू करणाऱ्या अजित पवार यांची ‘जादू’ मनसे उघड करेल, असा इशारा काही दिवसांपूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. आपणच पेपर काढायचा व परीक्षा देऊन आपणच उत्तीर्ण झाल्याचा निकाल द्यायचा असा हा प्रकार असल्याची टीका शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते सुभाष देसाई यांनी केली आहे. तर हजारो कोटींच्या घोटाळ्यांबाबत एक शब्दही श्वेतपत्रिकेत नसताना त्यांना मंत्रिमंडळात घेतल्यास अधिवेशनात सरकारला जाब द्यावा लागेल, असे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी सांगितले. मंत्रिमंडळातील बहुतेक मंत्र्यांची जागा खरे तर तुरुंगातच असल्याचे सांगून, अजित पवार यांना मंत्रिमंडळात घेतल्यास मुख्यमंत्र्यांनाही त्याचा जाब द्यावा लागेल असे मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर म्हणाले.

Story img Loader