लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक गाणे सादर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला हास्य कलाकार कुणाल कामरा याला मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवून मंगळवारी चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले होते. दरम्यान, कामरालाने चौकशीला उपस्थित राहण्यासाठी एक आठवड्याचा कालावधी मागितल्याचे समजले. याप्रकरणी शिवसेनेने (शिंदे) एमआयडीसी पोलिसांकडे कुणाल कामराविरोधात तक्रार केली होती. त्यानुसार याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानप्रकरणी पोलिसांसमोर हजर राहण्यासाठी एक आठवडा वेळ देण्याची मागणी कुणाल कामरा याने मंगळवारी केली. कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर विडंबनात्मक गाणे सादर केले. त्याबाबत तपास अधिकाऱ्यांनी कामराला मंगळवारी सकाळी ११ वाजता हजर राहण्याबाबत समन्स जारी केले होते. ती नोटीस कामराच्या वडिलांच्या निवासस्थानी पाठवण्यात आली होती. त्याच्या वडिलांनी ती स्वीकारल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. पण कामरा सध्या मुंबई नसल्याचे बोलले जात आहे.
शिवसेना नेते मुरजी पटे यांनी याप्रकरणी तक्रार केली आहे. तक्रारीनुसार, २३ मार्चला एका कार्यक्रमात असताना मला माझ्या मोबाइलवर पक्षातील एका कार्यकर्त्याने पाठवलेली लिंक प्राप्त झाली. त्यात कुणाल कामरा याने कॉन्टीनेन्टल हाँटेल, रोड नं ०३, खार पश्चिम, मुंबई या ठिकाणी केलेल्या एका स्टॅण्डअप कॉमेडी शोमधील व्हिडीओ क्लिप प्रसारित केली होती. त्यामध्ये कामरा स्टॅण्डअप कॉमेडी शोमध्ये शिवसेना (शिंदे) व शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची बदनामी करीत असल्याचे निदर्शनास आले.
ठाणे जिल्ह्यातील एक नेते असा उल्लेख करून त्यांनी विडंबनात्मक गाणे गायले. त्यामुळे एकमेकांप्रतीच्या भावना कलुशित होऊन दोन राजकीय पक्षांमध्ये व्देष भावना निर्माण होत आहे, असा आरोपी तक्रारीत करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री असल्याचे माहीत असून त्यांच्या नैतिक आचरणावर निंदाजनक वक्तव्य करून त्यांची बदनामी केली. तसेच आमच्या पक्षाच्या व आमच्या प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांच्या एकमेकांप्रतीच्या भावना कलुषित करून दोन राजकीय पक्षांमध्ये व्देष भावना उत्पन्न केल्या म्हणून त्याच्याविरोधात कायदेशीर तक्रार केली आहे, असेही त्यात म्हटले आहे
कामराचा आणखी एक व्हिडिओ
‘हम होंगे कामयाब’ या गाण्याच्या धर्तीवर कामराने ‘हम होंगे कंगाल’ हे गाणे रचले असून या गाण्याच्या चित्रफीतीत त्याने खार स्टुडिओच्या तोडफोडीचे चित्रीकरण अपलोड केले आहे. त्याची ही चित्रफीत समाज माध्यमांवर वायरल झाली आहे.