मुंबई : लांबपल्ल्यांच्या गाड्यांमधून प्रवास करून आलेल्या किंवा प्रवासासाठी निघालेल्या, मात्र काही कारणास्तव गाडीला विलंब होण्याची शक्यता असल्याने प्रवाशांसाठी टर्मिनसवर तात्पुरता निवारा असावा या उद्देशाने सीएसएमटी स्थानकात आरामदायक अशा पाॅड हाॅटेलची (कॅप्सूलच्या आकाराप्रमाणे खोल्या) उभारणी करण्यात आली आहे. आता लोकमान्य टिळक टर्मिनसवरही (एलटीटी) अशा प्रकारचे हॉटेल उभारण्यात येणार असून त्यासाठी मागविलेल्या निविदांना प्रतिसाद मिळू शकला नाही. परिणामी, येत्या १५ दिवसांत या कामासाठी फेरनिविदा मागविण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
इंडियन रेल्वे कॅटरिंग ॲण्ड टुरिझम (आयआरसीटीसी) आणि पश्चिम रेल्वेने नोव्हेंबर २०२१ मध्ये मुंबई सेन्ट्रल टर्मिनसवर पहिले पाॅड हाॅटेल सुरू केले. या हॉटेलमध्ये ४८ पाॅड असून यात क्लासिक पाॅड, महिला, दिव्यांग प्रवाशांसाठी, तसेच चार सदस्य असलेल्या कुटुबासाठी पाॅडची व्यवस्था आहे. यानंतर सीएसएमटीतील फलाट क्रमांक १४ जवळील पार्सल कार्यालयानजिक जुलै २०२२ मध्ये हे हॉटेल सुरू करण्यात आले. यामध्ये किमान ४० वातानुकूलित पॉड खोल्या आहेत. प्रत्येकी एक व्यक्ती राहू शकेल अशा ३० खोल्यांचा समावेश या हॉटेलमध्ये आहे. तर सहा पॉड खोल्यांमध्ये प्रत्येकी दोन जण आणि चार खोल्या या कुटुंबीयांसाठी आहेत. यामध्ये प्रवासी १२ ते २४ तास राहू शकतात. त्याप्रमाणे दर आकारणी करण्यात येते.
१२ तासांसाठी ५०० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये विश्रांतीसाठी आरामदायी व्यवस्था, सामान खोली, इंटरकॉम, लाॅकर, वायफाय, चार्जिंगची व्यवस्था, यूएसबी पोर्ट, टीव्ही, प्रकाश कमी-जास्त करण्याची सुविधा असलेले उत्तम विद्युत दिवे यासह अन्य सुविधांचा समावेश आहे. सीएसएमटीपाठोपाठच आता लोकमान्य टिळक टर्मिनसवरही पाॅड हाॅटेलची संकल्पना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे, आता फेरनिविदा मागविण्यात येणार आहे. येत्या १५ दिवसांत पुन्हा निविदा मागविण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.