भाकपचे ज्येष्ठ नेते आणि थोर विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या निधनामुळे महाराष्ट्राचे जनमत तापले असून त्यांच्या हत्येचा तीव्र शब्दांमध्ये निषेध करण्यात येत आहे. काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया
विचारांना सामना विचारांनी करण्याची हिम्मत नसणारे लोक असे भ्याड हल्ले करण्याचा मार्ग अवलंबतात. पानसरे यांचा पुरोगामी विचार महाराष्ट्र पुढे नेल्याशिवाय राहणार नाही. – शरद पवार
कुठे चाललाय माझा महाराष्ट्र असे म्हणण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण देशातच अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करून ठेवली आहे. हल्लेखोरांना पकडणे एवढे शासनाचे काम नसून त्यांचा पर्दाफाश करण्याची गरज आहे. रविवारी पूर्ण महाराष्ट्र बंदची हाक.- कॉ. भालचंद्र कांगो, भाकप महाराष्ट्र सचिव
ते स्पष्ट भूमिकेसाठी विख्यात होते. शिवाजी महाराजांवरील त्यांचे विचार आणि उजव्या अतिरेकी विचारांवरील त्यांच्या विचारांमुळे त्यांचे विरोधकांचा त्यांच्यावर रोष होता. डॉ. प्रकाश आंबेडकर, बहुजन भारिप महासंघ अध्यक्ष
गोळ्यांनी विचार मरत नाहीत, हे मारेकऱ्यांनी ध्यानात घ्यावे. विरोधात विचार मांडणारी माणसे मारली जात आहेत. सरकारला विरोधी विचार नकोसे झालेत काय ? डॉ. दाभोलकरांच्या हत्येचा तपास वेळेवर लागला असता तर ही घटना घडलीच नसती. कॉम्रेड पानसरे यांचे मारेकरी सापडेपर्यंत पोलिसांनी ‘सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य वापरणे थांबवावे. डॉक्टरांच्या हत्येनंतर तेव्हाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे देवेंद्र फडणवीस यांनी आता कोणत्या नैतिकतेच्या आधारे खुर्चीला चिकटून राहावे, याचा विचार करावा. — डॉ. हमीद दाभोलकर, अंधश्रद्धा निर्मूलन समिती
पानसरे यांना मारणाऱ्या प्रवृत्तींच्या विरोधात लढण्यासाठी पुरोगामी शक्तींनी एकत्र येऊन लढण्यासाठी सज्ज व्हायला हवे. तरुण, कष्टकरी, कामगार, महिलांच्या आंदोलनात पानसरे सदैव आघाडीवर असत.- किरण मोघे, ज्येष्ठ कम्युनिस्ट नेत्या
गोडसे प्रवृत्तींनी डॉ. दाभोलकरांची हत्या केली, हिंदुत्ववाद्यांनी पानसरेंवर गोळ्या घातल्या. मात्र पुरोगामी विचार मरणार नाही. महाराष्ट्रातून हजारो-लाखो दाभोलकर, पानसरे तयार होतील. – विश्वास उटगी, ज्येष्ठ कामगार नेते
आत्ताच आबांच्या निधनाच्या दु:खातून सावरत असतानाच पानसरे यांच्या निधनाच्या वृत्ताने मन सुन्न झाले आहे. पण आता सर्वांनी एकत्र येऊन अशा घटना थांबवायला हव्यात. महाराष्ट्राचे ऐक्य दाखवण्याची आता गरज आहे. – सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस</p>
शोषितांसाठी अखेरपर्यंत लढणारा पुरोगामी नेता महाराष्ट्राने गमावला आहे. त्यांच्या निधनामुळे झालेली चळवळीची हानी कधीही भरुन निघणार नाही. त्यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यातून ते बचावले व त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे आशादायक वृत्त आले असतानाच त्यांच्या निधनाची बातमी समजल्यावर धक्का बसला. – रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष, भाजपा
शोषीत, दु:खी लोकांचे नेतृत्व करणा-या, त्यांना आधार देणाऱ्या व्यक्तीवर सैतानी डोक्याची माणसेच हल्ला करू शकतात. हल्लेखोरांना पकडून कठोर शिक्षा होण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. – सुधीर मुनगंटीवार, अर्थमंत्री
छत्रपती शाहू महाराजांच्या भूमीत पुरोगामी विचारावर हल्ला होणे, हे धक्कादायक आहे. – रामदास आठवले, अध्यक्ष, आरपीआय