मुंबई : निवडणुकीच्या काळात उमेदवारांकडून मतदारांना वेगवेगळी आमिषे दाखविली जातात. यामध्ये मद्यपाटर्य़ाची चर्चा नेहमीच ऐकायला मिळते. मात्र मद्याचा महापूर रोखण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याला उपाययोजना करण्यास सांगितली आहे. यासाठी आयोगाने मोठी यादी दिली असून त्यानुसार राज्यातील उत्पादन शुल्क विभागाने कार्यवाही सुरू केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात भरारी पथकांची स्थापना करण्यात आली असून अचानक धाडी टाकण्याच्या सूचना उत्पादन शुल्क निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत. प्रामुख्याने उत्पादकांकडून होणारा मद्याचा साठा व किरकोळ तसेच घाऊक विक्रेत्यांकडून होणाऱ्या मद्याच्या खरेदी- विक्रीवर नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबतची माहिती तात्काळ अ‍ॅपद्वारे निवडणूक आयोगाला उपलब्ध करुन द्यायची आहे. याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून याबाबतचा दररोज अहवाल विहित पत्रात मागविला आहे.

हेही वाचा >>>उत्तर मुंबईला ‘उत्तम मुंबई’ करू; गोयल यांचा निर्धार ; राहुल गांधींनी लढण्याचे आव्हान

दैनंदिन काम सांभाळून उत्पादन शुल्क निरीक्षकांना किरकोळ व घाऊक मद्यविक्रेत्यांवर अचानक धाडी टाकण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. मोठय़ा प्रमाणात गावठी दारूचे उत्पादन होण्याची शक्यता असल्यामुळेही खास खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे.

विक्रीवर लक्ष

मद्य उत्पादकांना आता उत्पादन व विक्रीचे आकडे सादर करावे लागणार आहेत. याबाबतची आकडेवारी या उत्पादकांना याआधीही उपलब्ध करून द्यावी लागत होती. परंतु निवडणुकीच्या काळात दररोज यावर पाळत ठेवली जाणार आहे. मद्याच्या परवान्याविना मद्याची वाहतूक करणाऱ्यांविरोधातही कारवाई केली जाणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. मद्याचे उत्पादन व विक्री यावर आमचे नियंत्रण असतेच. परंतु निवडणुकीच्या काळात अधिक खबरदारी घ्यावी लागते.

बाहेरील राज्यातून मद्याची तस्करी रोखण्यासाठी तपासणी नाक्यांची संख्या वाढविण्यास सांगण्यात आले आहेत. राज्यात मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोव्यातून मद्याचा पुरवठा होण्याची शक्यता गृहीत धरून या ठिकाणी असलेले तपासणी नाके अधिक सक्षम करण्याच्याही सूचना करण्यात आल्या आहेत.

आयोगाच्या सूचना काय..

मद्य उत्पादकांकडील साठय़ाची सद्य:स्थिती व उत्पादनाची नोंद, गोदामातून पाठविण्यात आलेल्या मद्य उत्पादनाची नोंद, उत्पादकांच्या गोदामातून घाऊक व किरकोळ विक्रेत्यांना पाठविलेला साठा, किरकोळ विक्रेत्याकडील सद्यसाठय़ाची नोंद, किरकोळ विक्रेत्यांकडून मद्यखरेदी, किरकोळ विक्रेत्यांकडून होणारी मद्यविक्री, दररोजच्या मद्यविक्री व खरेदीची नोंद. अन्य विक्रेत्यांकडून होणारी मद्याची खरेदी व विक्री, तपासणी नाक्यांची संख्या, तपासणी नाक्यावर जप्त केलेल्या बेकायदा मद्याची नोंद, वेळोवेळी टाकलेल्या धाडींची माहिती, धाडीत सापडलेल्या मद्यसाठय़ाची माहिती, प्रतिबंधात्मक कारवाईची माहिती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Commission active to prevent supply of liquor during elections amy