गतवर्षांत खूनाचा प्रयत्न, सोनसाखळी चोरी तसेच घरफोडी या सारख्या गुन्ह्य़ांमध्ये वाढ झाल्याची कबूली ठाणे पोलीस आयुक्त के. पी. रघुवंशी यांनी गुरूवारी वर्षिक गुन्हे आढावा पत्रकार परिषदेत दिली. तसेच यंदाच्या वर्षांत सोनसाखळी चोरी, घरफोडीचे गुन्हे आणि महिलांवरील अत्याचार रोखण्याचे आव्हान असून त्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे असे पाच परिमंडळ असून त्यामध्ये २०११ तसेच गतवर्षी म्हणजेच २०१२ मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्य़ांची आकडेवारी आयुक्त रघुवंशी यांनी यावेळी दिली. या आकडेवारीनुसार, २०११ मध्ये खून, खूनाचा प्रयत्न, दरोडा, दरोडय़ाची तयारी, जबरी चोरी, सोनसाखळी चोरी, घरफोडी, चोरी, वाहन चोरी, बलात्कार, विनयभंग अशा स्वरुपाचे ९१४७ गुन्हे दाखल होते, त्यापैकी ५६९३ गुन्हे उघडकीस आले होते. तर २०१२ मध्ये अशा स्वरूपाचे ९५४१ गुन्हे दाखले असून त्यापैकी ५८१९ गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच २०११ मध्ये ६२ टक्के तर २०१२ मध्ये ६१ टक्के गुन्हे उघडकीसचे प्रमाण असून त्यामध्ये मोठय़ा प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे २०११ च्या तुलनेत २०१२ मध्ये खून, दरोडा, दरोडय़ाची तयारी, इतर जबरी चोरी, वाहन चोरी या गुन्ह्य़ांमध्ये घट झाली असून खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी, सोनसाखळी चोरी, घरफोडी, चोरी, बलात्कार, विनयभंग या गुन्ह्य़ांमध्ये वाढ झाली आहे. वेगवेगळ्या कायद्याखाली २०११ मध्ये १८, ५०५ तर २०१२ मध्ये १६,४९६ जणांविरोधात प्रतिबंधक कारवाई करण्यात आली असून २०११ च्या तुलनेत २०१२ मध्ये २००९ ने कारवाईत घट झाली आहे. २०१२ मध्ये अंमली पदार्थासंदर्भातील २४ गुन्हे दाखल असून त्यामध्ये ३५ आरोपींना अटक करून २० लाख ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच परकीय नागरीक कायद्याखाली २५ गुन्हे दाखल असून त्यामध्ये १३० बांग्लादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. यंदाही सोनसाखळी चोरी, घरफोडीचे गुन्हे तसेच महिलांवरील अत्याचार रोखण्याचे आव्हान असून त्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार असल्याचे रघुवंशी यांनी सांगितले. तसेच सोनसाखळीच्या चोरीमध्ये इतर जिल्ह्य़ातील गुन्हेगार सक्रिय असल्याचे तपास समोर आले आहे. त्यामुळे राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाशी समन्वय साधून सोनसाखळी चोरांवर लक्ष ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गुन्हा कुठेही घडला तरी आधी तो दाखल करून घ्यावा, त्यानंतर हद्द ठरवावी, अशा सुचना दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ठाण्यातील गुन्हेगारी वाढली ; पोलीस आयुक्तानीच दिली कबुली
गतवर्षांत खूनाचा प्रयत्न, सोनसाखळी चोरी तसेच घरफोडी या सारख्या गुन्ह्य़ांमध्ये वाढ झाल्याची कबूली ठाणे पोलीस आयुक्त के. पी. रघुवंशी यांनी गुरूवारी वर्षिक गुन्हे आढावा पत्रकार परिषदेत दिली. तसेच यंदाच्या वर्षांत सोनसाखळी चोरी, घरफोडीचे गुन्हे आणि महिलांवरील अत्याचार रोखण्याचे आव्हान असून त्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have a account? Sign in
First published on: 01-02-2013 at 03:33 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Commissioner accepted increase crime in thane