मुंबई : एमएचटी सीईटीच्या परीक्षेतील प्रश्न व उत्तर तालिकाबाबत विद्यार्थ्यांकडून दिलेल्या मुदतीनंतरही आक्षेप नोंदवण्यात येत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत एमएचटी सीईटीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती राज्य सामाईक प्रवेश कक्षाचे (सीईटी कक्ष) आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी दिली. एमएचटी सीईटीची परीक्षा २२ एप्रिल ते १६ मे दरम्यान झाल्यानंतर सीईटी कक्षाकडून निकालाबाबत वेगवेगळ्या तारखा जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निकालाबाबत संभ्रम होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र व कृषी शिक्षण पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पीसीबी गटाची परीक्षा २२ ते ३० एप्रिल २०२४ दरम्यान, तर पीसीएम गटाची परीक्षा २ ते १६ मे २०२४ दरम्यान घेण्यात आली होती. या दोन्ही परीक्षांमधील प्रश्न व उत्तर तालिका विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदवण्यासाठी उपलब्ध केले होते. यावर आक्षेप नोंदवण्यासाठी विद्यार्थ्यांना २६ मेपर्यंत मुदत दिली होती. यानंतर सीईटी कक्षाकडून प्रथम जूनच्या पहिल्या आठवड्यात, त्यानंतर निकालाची संभाव्य तारीख १० जून जाहीर केली.

हेही वाचा >>>म्हाडाच्या भूखंडावरील अनधिकृत जाहिरात फलक हटविण्यास अखेर सुरुवात; विलेपार्ले येथील फलक आज हटवणार

दरम्यान, अनेक विद्यार्थी आणि पालकांच्या आक्षेपांची नोंद सीईटी कक्षाकडून घेतली. आक्षेपातील तथ्य जाणून घेण्यासाठी तातडीने तज्ज्ञांची बैठक घेत पडताळणी केली. यात सात आक्षेपांमध्ये तथ्य आढळले. त्यामुळे चुकीच्या प्रश्नांची संख्या ५४ झाली. या प्रश्नांचे पूर्ण गुण विद्यार्थ्यांना मिळणार आहेत, अशी माहिती सरदेसाई यांनी दिली.

निकाल १९ जूनपूर्वी

एमएचटी सीईटीचा निकाल १९ जून किंवा त्यापूर्वी जाहीर करण्यात येईल, असे सीईटी कक्षाकडून संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. मात्र, प्रवेश प्रक्रियेला लवकर सुरुवात व्हावी, यासाठी हा निकाल येत्या तीन-चार दिवसांत म्हणजे १९ जूनपूर्वीच जाहीर करण्यात येणार असल्याचे समजते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Commissioner dilip sardesai informed that the date of mht cet result has been postponed mumbai print news amy
Show comments