आयएनएस विक्रांतवरील संग्रहालयाच्या संवर्धनासाठी खारुताईचा वाटा म्हणून गेल्या चार वर्षांच्या अर्थसंकल्पात प्रस्तावित केलेले १०० कोटी रुपये पडून आहेत. पाकिस्तानबरोबरच्या युद्धात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे आयएनएस विक्रांत मोडीत निघू नये यासाठी पालिकेने राज्य सरकार आणि नौदलाशी चर्चा करून आर्थिक मदतीचा हात पुढे करावा, अशी मागणी स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडे केली आहे.
१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात आयएनएस विक्रांतने मोलाची कामगिरी केली होती. दोन महावीरचक्र आणि १२ वीरचक्रांचा मान मिळवून देणाऱ्या आयएनएस विक्रांतवर आरमारी यशोगाथेचे संग्रहालय उभारण्यात येणार होते. हे संग्रहालय उभे करण्यासाठी पालिकेने गेल्या चार वर्षांमध्ये पालिका अर्थसंकल्पात प्रत्येकी २५ कोटी रुपयांची तरतूद केली होती. मात्र ही रक्कम पालिकेच्या तिजोरीत तशीच पडून आहे. आयएनएस विक्रांत मोडीत निघण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विजयाची गाथा सांगणारी ही युद्धनौका वाचविण्यासाठी पालिका आयुक्तांनी पुढाकार घ्यावा आणि राज्य सरकार आणि नौदलाशी चर्चा करावी, अशी विनंती शेवाळे यांनी आयुक्तांना पत्र पाठवून केली आहे.

Story img Loader