लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: उकाड्यापासून बचाव करण्यासाठी प्रवासी तिकिटासाठी जादा पैसे मोजून वातानुकूलित लोकलमधून प्रवास करीत आहेत. मात्र, वातानुकूलित यंत्रणेत वारंवार बिघाड होत असल्याने प्रवासी हैराण झाले आहेत. पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलमधील वातानुकूलित यंत्रणा बुधवारी सकाळी बिघडल्याने प्रवाशांना उन्हाची काहिली सहन करावी लागली.
लोकलचे दरवाजे बंद होत असल्याने काही प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. परिणामी, वांद्रे स्थानकात लोकल पोहोचल्यानंतर संतप्त प्रवाशांनी ५ ते १० मिनिटे लोकलचे दरवाजे बंदच होऊ दिले नाहीत. दरम्यान, या गोंधळानंतर पश्चिम रेल्वे प्रशासनाने यंत्रणेतील बिघाड दुरुस्त करून लोकल मार्गस्थ केली.
बुधवारी सकाळी ७.५६ वाजताच्या विरार-चर्चगेट जलद लोकलच्या दोन डब्यातील वातानुकूलित यंत्रणा बिघडली. त्यामुळे विरारपासूनच प्रवाशांचा गोंधळ सुरू झाला. प्रवासी लोकलचा दरवाजा बंदच होऊ देत नसल्याने भाईंदर, मीरा रोड, दहिसर, बोरिवली या स्थानकांवर लोकल जादा वेळ थांबवण्यात आली. लोकलमधील गर्दी वाढल्याने प्रवाशांचा श्वास कोंडू लागला. वातानुकूलित लोकलमध्ये प्रवासी घामाच्या धारांनी हैराण झाले. परिणामी, वांद्रे स्थानक आल्यानंतर प्रवाशांनी एकच हल्लाबोल करून वातानुकूलित लोकलचे दरवाजे बंदच होऊ दिले नाहीत. प्रवाशांचा गोंधळ ५ ते १० मिनिटे सुरूच होता. अखेर पश्चिम रेल्वेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्थानकात धाव घेऊन लोकलमधील वातानुकूलित यंत्रणेतील बिघाड दुरुस्त केला. त्यानंतर लोकल चर्चगेटला रवाना झाली.