मुंबई : मध्य रेल्वेवरील दिवा स्थानकात वाढणारी गर्दी बघता, दिवा रेल्वे स्थानकावरून थेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) साठी लोकल सुरू करण्यासाठी रेल्वे प्रवासी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तसेच कोकण रेल्वेकडे जाणाऱ्या गाड्यांना दिवा येथे थांबा देण्यासाठी दिवा प्रवासी संघटनेद्वारे १४ ऑगस्ट रोजी काळ्या फिती लावून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वेवरील ठाणे आणि डोंबिवलीदरम्यान असलेले दिवा हे प्रचंड गर्दीचे स्थानक आहे. गेल्या काही वर्षात दिवा येथे लोकवस्ती वाढल्याने, लोकल प्रवाशांची गर्दीही वाढली. त्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी आणि गर्दीमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन लक्ष देत नाही. त्यामुळे दिवा स्थानकातून लोकलच्या दरवाज्याला लटकून प्रवास करावा लागतो. परिणामी, प्रवाशांचा अपघाती मृत्यू होतो किंवा प्रवासी जखमी होतात. तसेच दिवा स्थानकात सुमारे १.२६ लाख तिकीट विक्रीतून दैनंदिन महसूल सुमारे ६.६२ लाख रुपये आहे. मात्र, एवढी कमाई होत असून देखील दिवा-सीएसएमटी लोकल सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे आता रेल्वे प्रशासनाचा निषेध करण्यासाठी १४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता प्रवाशांचा काळ्या फिती वाटण्यात येणार आहेत. प्रवासी त्या फिती बांधून प्रवास करतील, असे दिवा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष आदेश भगत यांनी सांगितले.
हेही वाचा – धरणे कठोकाठ तरीही वरळीत ठणठणाट; वरळी, लोअर परळ, करीरोड येथे कमी दाबाने पाणीपुरवठा
तसेच दिवा स्थानकातून कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना थांबा देणे आवश्यक आहे. उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, दिवा, वसई-विरार, ठाणे, मुलुंड, भांडूप येथे मोठ्या प्रमाणात कोकणवासीय राहतात. त्यामुळे कोकणात जाण्यासाठी दिवा रेल्वे स्थानक महत्त्वाचे आहे. त्यामुळे मुंबईच्या पूर्व, पश्चिम उपनगरातील आणि ठाणे जिल्ह्यातील कोकणी प्रवाशांसाठी दिवा स्थानक महत्त्वाचे आहे. त्यामुळे या स्थानकातून जाणाऱ्या कोकणातील रेल्वेगाड्यांना थांबा देण्यात यावा, अशी मागणी भगत यांनी केली.