मुंबईः चढ्या भावाने हिऱ्यांची आयात करणाऱ्या कंपनीच्या संचालकाला नुकतीच सीमाशुल्क विभागाने अटक केली. आरोपी संचालकाला यापूर्वी गुजरातमधील महसूल गुप्तवार्ता संचलनालयाने (डीआरआय) अटक केली होती. त्याप्रकरणी जामिनावर सुटल्यानंतर आरोपी संचालकाने पुन्हा तशाच प्रकारचा गुन्हा केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मे. रामपुरिया एक्सपोर्ट प्रा. लिमि.ने १९ कोटी ७० लाख रुपये किंमतीच्या हिऱ्यांची आयात केली होती. संबंधित हिरे चढ्या भावाने आयात करण्यात आल्याची माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती. त्यामुळे सीमाशुल्क विभागाने त्रिसदस्यीय तज्ज्ञांच्या समितीकडून हिऱ्यांची तपासणी करून घेतली असता त्यांची किंमत १३ कोटी २९ लाख रुपये असल्याचे निष्पन्न झाले. बाजारभावापेक्षा सहा कोटी ४१ लाख रुपये अधिक किंमत दाखवून हिरे आयात करण्यात आल्याचे उघड झाले. त्यानंतर सीमाशुल्क विभागाने कंपनीच्या मुंबईतील ऑपेरा हाऊस परिसरातील कार्यालयात छापा टाकला. त्यात १०६८ कॅरेटचे हिरे व काही कच्च्या स्वरूपातील हिरे ताब्यात घेण्यात आले. या हिऱ्यांच्या खरेदीबाबत कोणतीही ठोस कागदपत्रे उपलब्ध करण्यात न आल्यामुळे त्यांचे मूल्यांकन करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. या आयातीमागे सागर शाह याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे सीमाशुल्क विभागाने त्याला अटक केली.

हेही वाचा >>>मुंबई: नायर दंत महाविद्यालयातील सार्वजनिक आरोग्य दंतचिकित्सा विभाग अद्ययावत होणार

कच्च्या हिऱ्यांच्या निर्यातीसाठी किम्बर्ले प्रक्रिया प्रमाणपत्राची आवश्यकता असते. पण या प्रमाणपत्राशिवायच हिऱ्यांची आयात करण्यात आल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. आरोपी संचालकाने आयात केलेले हिरे त्याच्या मालकीचे नसून केवळ त्याचा आयात-निर्यात कोड वापरण्यात आला आहे. त्या बदल्यात त्याला ०.३ टक्के कमिशन मिळत होते. याप्रकरणी सीमाशुल्क विभागाने सीमाशुल्क कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून शाहला अटक केली. यापूर्वी सुरत सेझ येथून अन्य ठिकाणी बेकायदेशिररित्या हिरे नेल्याच्या आरोपाखाली गुजरात डीआरआयने त्याला अटक केली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Company director arrested for illegal import of diamonds mumbai print news amy