गेल्या पाच ते सहा वर्षांपासून रासायनिक प्रदूषणाचे आगर बनलेल्या डोंबिवलीतील महाराष्ट्रऔद्योगिक विकास महामंडळाच्या वसाहतीतील ३९ कंपन्यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषणाचे कारण देत बंद करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत.
तसेच गेल्या आठवडय़ात पावसामुळे एमआयडीसी भागात ‘हिरवा गालिचा’ तयार करणाऱ्या ओंकार इंजिनीअर या रंगकाम करणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्यात आली आहे, असे ‘एमपीसीबी’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
डोंबिवली औद्योगिक क्षेत्रात गेल्या वर्षांपासून हवेतील प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. रात्रीच्या वेळेत अनेक कंपन्या रासायनिक घटक हवेत सोडून प्रदूषण करीत आहेत. हे सगळे व्यवहार चोरून-लपून सुरू असल्याने नागरिक त्रस्त आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी, पोलिसांकडून या घातक रसायने सोडणाऱ्या कंपन्यांवर कोणतीही कारवाई करीत नसल्याने नागरिकांचा रोष वाढला आहे.
गेल्या आठवडय़ात अवकाळी पाऊस पडल्यानंतर एमआयडीसी भागात हिरवा गालिचाचा थर जमिनी, घरांच्या छपरावर तयार झाला. त्यानंतर वाढत्या प्रदूषणाचा आवाका लक्षात आल्याने एमपीसीबीच्या मुंबईतील अधिकाऱ्यांनी या भागात धाव घेतली होती.
प्रदूषणामुळे सतत टीकेची झोड उठल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण कार्यालयाने एमआयडीसीतील ३९ कंपन्यांना बंद करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. या कंपन्यांचे प्रथम वीज, पाणी खंडित करण्यात येणार आहे, अशी माहिती साहाय्यक प्रादेशिक अधिकारी भिंगारदिवे यांनी दिली. तसेच ओंकार इंजिनीअर (पेन्ट) कंपनीतून पसरलेल्या रासायनिक घटकांमुळे पावसामुळे हिरवा गालिचा तयार झाल्याचा निष्कर्ष एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी काढला आहे. या कंपन्यांवर कारवाई होणार असल्याने सुमारे आठ ते दहा हजार कामगार बेरोजगार होतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Story img Loader