मुंबई: गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून १८५ गुंतवणूकदारांची ४५ कोटी ४१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हैदराबादमधील कंपनीतील संचालक व प्रतिनिधींसह १० जणांविरोधात अंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी गुंतवणुकीवर वर्षिक १२ ते १८ टक्के व्याज देण्याचे आश्वासन दिले होते. पण रक्कम परत न करता कंपनी बंद करून फसवणूक केल्याचा आरोप आहे. गुंतवणूकदारांमध्ये चार्टर्ड अकाउंटंट, व्यावसायिक, चांगल्या पदावरील नोकरदारांचा समावेश आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा पुढील तपास करणार असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.

हैदराबादमध्येही याबाबत गुन्हा दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली. फसणूक झालेल्या गुंतवणूकदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.तक्रारदार स्मिता नीरज दुबे (३७) याचा व्यवसाय असून त्या अंधेरी पश्चिम येथील रहिवासी आहेत. याप्रकरणी आरोपी कंपनी व संचालकांनी फाल्कन इन्वॉईस डिस्काउंटींग योजना राबवली होती. त्यात गुंतवणूक केल्यास वार्षिक १२ ते १८ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. त्यानुसार तक्रारदार महिलेने २५ जुलै, २०२४ रोजी त्यात गुंतवणूक केली. तक्रारदार महिलेसह इतर १८४ गुंतणूकदारांनी या योजनेत गुंतवणूक केली. तक्रारीनुसार, १८५ गुंतवणूकदारांनी ४५ कोटी ४१ लाख १३ हजार ७०० रुपये एवढी रक्कम या योजनेत गुंतवली.

आरोपींनी आश्वासनानुसार परतावा न देता कंपनीचे कार्यलय बंद करून फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी दुबे यांच्या तक्रारीवरून अंबोली पोलिसांनी कॅपिटल प्रोटेक्शन फोर्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अमरदीपकुमार सिंह, संचालक अनिता कुमारी, संचालक पवन ओडेला, संदीप कुमार, आर्यन सिंह, योगेंद्र सिंह, काव्या नलुरी, अविनाश कुमार, ए. जी. एस नायर व समीर नायर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१६ (२), ६१ (२), तसेच महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण (एमपीआयडी) कायदा, १९९९ कलम ३ व ४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणीचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. याप्रकरणी हैदराबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी दुबईला गेल्याचा संशय आहे. आरोपींनी सहा गुंतवणूक योजना राबवल्या होत्या. त्याद्वारे राज्यातील ३०० जणांची फसवणूक केल्याचा संशय आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मुंबईत १० वर्षांत ५१ लाख गुंतवणूकदारांची फसवणूक

मुंबईत गेल्या १० वर्षांमध्ये गुंतवणुकीच्या नावावर फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या १० वर्षांत विविध गुंतवणूक योजनांद्वारे ५१ लाख गुंतवणूकदारांची १५ हजार ५०० कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे गुंतवणूक फसवणूक रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी आर्थिक गुप्तवार्ता कक्षाची स्थापना केली आहे. फसवणूक होण्यापूर्वीच आर्थिक गुन्हे रोखण्यासाठी गुप्त माहिती गोळा करण्याचे काम या कक्षाद्वारे करण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकारे आर्थिक गुप्तवार्ता कक्षांची स्थापना करण्याचे नियोजन असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.