दिशा काते, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : मुंबई रेल्वे विकास मंडळाच्या बोरिवली विरार दरम्यान रेल्वे प्रकल्पासाठी केंद्रीय पर्यावरण विभागाने मंजुरी दिली असून या प्रकल्पामुळे तेथील कांदळवने बाधित होणार आहेत. त्याची नुकसान भरपाई म्हणून गडचिरोलीत वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बोरिवली ते विरार स्थानकांदरम्यान मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एम.आर.व्ही.सी ) प्रकल्पासाठी १२.८ हेक्टर क्षेत्रावर असलेल्या कांदळवनांचे स्थलांतर करण्यासाठी मंजुरी केंद्रीय पर्यावरण , वन व हवामान बदल मंत्रालयाने दिली आहे. त्याचवेळी होणाऱ्या नुकसानाची भरपाई म्हणून वनीकरण करण्याची अटही घालण्यात आली आहे. बोरिवली ते विरार या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी केंद्राने १७ नोव्हेंबर रोजी मान्यता दिली होती. दरम्यान, कांदळवन आणि जमिनीवरील झाडे निसर्गात जैवविविधतेच्यादृष्टीने निरनिराळ्या भूमिका बजावतात. कांदळवनाचा विनाश पर्यावरणावर आणि मच्छिमार समाजाच्या उपजीवीकेवर परिणाम करतो. या नुकसानाची भरपाई ९०० किलोमीटर दूर, जेथे कांदळवनेच नाहीत तेथे करण्याचा निर्णय निरुपयोगी ठरेल असे मत पर्यावरण अभ्यासक व्यक्त करीत आहेत. मुंबई किनारपट्टीवरील जैवविविधतेच्या नुकसानाची भरपाई गडचिरोलीत कशी होईल असा प्रश्न तज्ज्ञांकडून उपस्थित करण्यात येत आहे. यापूर्वी ऑक्टोबरमध्ये नवी मुंबई सागरी रस्त्यामुळे होणाऱ्या कांदळवनाच्या नुकसान भरपाईसाठी जळगावमधील एका गावात केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने परवानगी दिली होती.

आणखी वाचा-मुंबई : परदेशातील नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक

कांदळवनामध्ये झाडे, झुडपे, ताड जातीची झाडे, औषधी वनस्पती आणि जमिनीलगत वाढणाऱ्या प्रजातींचा समावेश असतो.त्यांच्या मुळांचा जमिनीवर असलेला भाग गुंतागुंतीसारखा वाटत असला तरी ही मुळे एकप्रकारे भरतीच्या पाण्याचा वेग रोखणाऱ्या बफरसारख काम करतात.सर्वात महत्त्वाचं म्हणजे कांदळवने ही हवामान बदलाचा सामना करण्यासाठीही मदत करतात कांदळवनातले वृक्ष आणि दलदल हे कार्बन सिंक सारखे काम करतात म्हणजे तो मोठ्या प्रमाणात कार्बन शोषून घेतात तसेच ते जलचर प्राणी जसे की, मासे, खेकडे याचे आश्रय स्थान आहे.कांदळवन ही उपजिविकेचे साधन म्हणून देखील ओळखले जाते. त्यामुळे कांदळवन हे सागरी किनाऱ्यांसाठी लाभलेले वरदान आहे.

कांदळवनाचे डायव्हर्जन करण्याचा अर्थ कांदळवन नष्ट करणे असाच निघतो आाणि सरकारने ९०० किलोमीटर दूरवर वृक्षारोपण करून नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करणे निरर्थक आहे. -बी. एम. कुमार, संचालक, नॅटकनेक्ट फाउंडेशन

शेकडो मैल दूर करण्यात येणारे नुकसानभरपाई वृक्षारोपण निरुपयोगी ठरेल. यामुळे मच्छिमार समाजाच्या उपजिविकेवर परिणाम करतो. -नंदकुमार पवार, अध्यक्ष, लघु पारंपारिक मत्स्य कामगार संघटना

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Compensation of mumbai kandalvans in gadchiroli mumbai print news mrj
Show comments