आझाद मैदानात ११ ऑगस्ट रोजी झालेल्या हिंसाचारात शासकीय मालमत्तेचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. त्या नुकसान भरपाईची प्रक्रिया येत्या सोमवार पासून होणार आहे. मुंबईच्या गुन्हे शाखेने एकूण २ कोटी ७४ लाख रुपयांच्या नुकसान भरपाईचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला होता.
११ ऑगस्टला झालेल्या हिंसाचारात २४ बेस्ट बसेस, १५ पोलिसांचे वाहने, १ अग्निशमन दलाचे वाहन, पालिकेच्या गाडय़ांची मोडतोड झाली होती. मुंबईच्या गुन्हे शाखेने या नुकसानीचा २ कोटी ७४ लाख रुपयांच्या नुकसान भरपाईचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला होता. त्यानुसार आता संबंधितांवर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नोटीसा बजावल्या जाणार आहेत.
म्यानमार आणि आसाम मधील मुस्लिमांवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी आझाद मैदानात ‘मदिन उल इलम’ या संघटनेच्या पुढाकाराने प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेला जमाव प्रक्षुब्ध झाला आणि हिंसाचार सुरू झाला होता. या हिंसाचारात शासकिय मालमत्तेबरोबरच खाजगी मालमत्तेचेही नुकसान झाले होते.   

Story img Loader