निवडणुकीचे काम करत असताना अनेक शिक्षकांना दुखापती झाल्या, तर काहींचा काम करताना मृत्यूही झाला. जखमी शिक्षकांना आणि मृत शिक्षकांच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी केली आहे.
निवडणुकीचे काम करत असताना वैशाली भोले यांचा केंद्रावरच हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. असाच मृत्यू उल्हासनगर परिसरात उन्हामध्ये मतदारांच्या पावत्या वाटण्याचे काम करणाऱ्या अनंत साळवे यांचाही झाला. साळवे यांना उन्हाचा त्रास झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र जे. जे. रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. ते उल्हासनगर येथील तक्षशिला विद्यालयात काम करत होते. इतकेच नव्हे तर डोंबिवली येथील प्रगती महाविद्यालयातील सोनाली कुडची यांच्या पायावर टेबल पडल्यामुळे त्यांना पायाची तीन बोटे गमवावी लागली आहेत. त्यांच्यावरील शस्त्रक्रियेसाठी ३० ते ४० हजार रुपयांचा खर्चही झाला आहे.
इतकेच नव्हे तर टिटवाळा येथील गणेश विद्यामंदिरमध्ये काम करणारे पालेकर यांची डोंबिवलीत निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती करण्यात आली होती. तेथे ते चक्कर येऊन पडले आणि त्यांचा उजवा हात फ्रॅक्चर झाल्याची माहिती मोते यांनी या पत्रात दिली आहे.
या सर्व जखमी शिक्षकांना व निधन पावलेल्या शिक्षकांच्या नातेवाईकांना निवडणूक आयोगातर्फे मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी पत्रात केली आहे. याचबरोबर यापुढे शिक्षकांना केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून कामे देऊ नयेत. तसेच गरोदर महिला, हृदयविकाराने आजारी महिला तसेच हृदय शस्त्रक्रिया झालेल्या कर्मचाऱ्यांना दमदाटी करून तुरुंगामध्ये टाकण्याची भाषा करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी पत्रात केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा