विधान परिषदेच्या स्थानिक संस्था प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये गटबाजी, आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. इच्छुकांनी दिल्ली गाठली असून, प्रतिस्पध्र्याचे तिकीट कापण्याकरिता प्रयत्न सुरू झाले आहेत.
कोणत्याही निवडणुकीत काँग्रेसमध्ये वादावादी, गटबाजीचे चित्र बघायला मिळते. हेच चित्र विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने निर्माण झाले आहे. गटबाजी मिटविण्याकरिता पक्षाच्या नेत्यांना स्थानिक नेत्यांची समजूत काढावी लागत आहे. आठपैकी चार काँग्रेसचे आमदार असून, या चारही जागा कायम राखण्याचे पक्षापुढे मोठे आव्हान आहे.
कोल्हापूर मतदारसंघात विद्यमान आमदार महादेव महाडिक यांनी पक्षाकडे पुन्हा उमेदवारी मागितली आहे, तर कोल्हापूर महापालिकेत काँग्रेसला सत्ता मिळवून देणारे माजी राज्यमंत्री सतेज पाटील यांनीसुद्धा जोर लावला आहे. महाडिक यांच्या ताराराणी आघाडीने भाजपशी हातमिळवणी करून महापालिकेची निवडणूक अलीकडेच लढविली. पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्याने महाडिक यांना उमेदवारी देण्यास काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी विरोध दर्शविला आहे. सतेज पाटील यांना शह देण्याकरिता जिल्ह्य़ातील काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी महाडिक यांना पाठिंबा दिला आहे. कोल्हापूरचा वाद मिटविण्याकरिता पक्षाच्या नेत्यांचा घाम निघेल, अशीच चिन्हे आहेत. धुळे-नंदुरबार हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघातील विद्यमान आमदार अमरीश पटेल यांना पुन्हा उमदेवारी देण्यास पटेल यांचे एकेकाळचे निकटवर्तीय आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विरोध केला आहे. रघुवंशी यांचे धुळे, नंदुरबार पट्टय़ात वर्चस्व आहे. रोहिदास पाटील यांचाही या मतदारसंघावर डोळा आहे. ‘शिक्षण सम्राट’ म्हणून प्रसिद्ध असलेले पटेल दिल्लीतून जोर लावतील, अशी शक्यता आहे. नागपूरमध्ये विद्यमान आमदार राजेंद्र मुळक यांच्यासह माजी मंत्री सतीश चतुर्वेदी हेसुद्धा इच्छुक आहेत. नागपूरची जागा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रतिष्ठेची करणार हे निश्चित आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपचा उमेदवार निवडून आणण्याकरिता सारी शक्ती पणाला लावली जाईल, अशी चिन्हे आहेत. तरीही काँग्रेसमध्ये चुरस आहे. मुंबईत काँग्रेसला बाहेरून मते विकत घ्यावी लागणार आहेत. यामुळेच एखाद्या सधन नेत्यालाच रिंगणात उतरविले जाईल. भाई जगताप हे विद्यमान आमदार असून, त्यांनी या दृष्टीने मतांची जुळवाजुळव सुरू केली आहे. मनसे आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळाल्यास काँग्रेसला सोपे जाईल. राष्ट्रवादीने पाठिंबा दिला तरीही मतांचे गणित जुळत नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा